कवठेमहंकाळ तालुक्यात ६६ टक्के पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:19 AM2021-07-01T04:19:56+5:302021-07-01T04:19:56+5:30

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामीण भागात अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील अद्याप पेरण्या अपूर्ण आहेत. गतवर्षीच्या तुलनेत पर्जन्यमान यंदा घटल्याचे ...

66% sowing completed in Kavthemahankal taluka | कवठेमहंकाळ तालुक्यात ६६ टक्के पेरण्या पूर्ण

कवठेमहंकाळ तालुक्यात ६६ टक्के पेरण्या पूर्ण

Next

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामीण भागात अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील अद्याप पेरण्या अपूर्ण आहेत. गतवर्षीच्या तुलनेत पर्जन्यमान यंदा घटल्याचे चित्र आहे. यामुळे सध्या बळिराजा चिंताग्रस्त दिसून येत आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील पाचही कृषी मंडळांतील पर्जन्यमानाचा विचार करता गतवर्षी जून महिन्यात पडलेल्या पावसाच्या मानाने या वर्षीचे प्रमाण अत्यल्प दिसून येते. त्यामुळे खरीप हंगामातील अन्नधान्यासह कडधान्ये, गळीत धान्यांची पेरणी तुलनेने कमी झाली आहे. एकेकाळी कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या तालुक्यात एकाही ठिकाणी कापूस लागवड झालेली नाही. त्याचप्रमाणे ऊस पीकही तालुक्यातून हद्दपार होत असल्याचे चित्र आहे. गळीत धान्यांपैकी सूर्यफूल आणि तीळ लागवड तर जवळपास शून्य आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील पूर्वोत्तर भागात अत्यंत किरकोळ स्वरूपात पाऊस झाला. एरव्ही होणारा उन्हाळी पाऊसही यंदा झाला नाही. त्यामुळे शेतीच्या संपूर्ण मशागतीची कामेही पूर्ण होऊ शकली नाहीत. पर्यायाने पेरणीचा प्रश्नच उद्भवला नाही. तालुक्यातील ढालगाव कृषी मंडलात जून महिन्यात फक्त १० दिवस साधारण पाऊस झाला. तो जरी १७५ मि.मी. दिसत असला तरी पेरणीयोग्य म्हणजे जमिनीत ओलावा निर्माण करणारा नसल्याने खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या अल्प झाल्या आहेत. साधारणपणे हीच अवस्था तालुक्यातील सर्वच कृषिमंडलात असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील पर्जन्यमान कमी झाल्याने लागवड क्षेत्र असूनही अनेक ठिकाणी पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी पेरण्या केल्याचे दिसते. सध्या खरीप हंगामातील पेरण्या झाल्याचे दिसत असले तरी अद्यापही सुमारे ६० टक्के क्षेत्र पेरणीसाठी पावसाची वाट पाहत आहे. गतवर्षी अवकाळी पाऊस, उन्हाळी पाऊस झाला होता. त्याचबरोबर टेंभू योजनेतील पाणी उपलब्ध होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामातील पेरण्या झाल्या होत्या. तथापि यावर्षी उन्हाळी, हंगामी पाऊस पुरेसा झाला नाही. टेंभू योजनेचे पाणी उपलब्ध नसल्याने पेरण्यांसाठी बळिराजा अजूनही आभाळाकडे नजर लावून बसला आहे.

----------------

जून महिन्यातील मंडलनिहाय पाऊस

ढालगाव : १७५

देशिंग : १४६

कुची : १५१

कवठेमहांकाळ : १४०

हिंगणगाव : १४८

सरासरी पाऊस : १४८

-----------------

पेरणीच्या क्षेत्राची माहिती

पीक, पेरणीयोग्य क्षेत्र, झालेली पेरणी व टक्केवारी पुढील

ज्वारी (५३९८,१३२४,२५%),

बाजरी (८०५३,३५७६,४४%),

मका (४६७२,५९३९,१२७%).

इतर तृणधान्य (९८,१५७,१६०%)

तूर (३४७,८१,२३%),

उडीद (७२०,२५०९,३४८%),

मूग (४७०,८९,१९%)

इतर कडधान्य (१३०२,२५५,२०),

भुईमूग (७०६,७४७,१०६%),

सोयाबीन (५०३,१०७,२१%),

सूर्यफूल व तीळ पेरणी नाही.

त्याचप्रमाणे कापूस, ऊस यांचीही लागवड नाही.

Web Title: 66% sowing completed in Kavthemahankal taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.