सांगली जिल्ह्यात ६६६ कोटी कर्ज थकीत, जिल्हा बँकेकडून वसुलीची विशेष मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 19:26 IST2025-03-04T19:25:47+5:302025-03-04T19:26:22+5:30
सांगली : जिल्ह्यातील विकास सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना दिलेल्या पीक कर्ज वाटपापैकी ५९ हजार कर्जदारांकडे चक्क ६६६ कोटी रुपये थकीत आहेत. ...

सांगली जिल्ह्यात ६६६ कोटी कर्ज थकीत, जिल्हा बँकेकडून वसुलीची विशेष मोहीम
सांगली : जिल्ह्यातील विकास सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना दिलेल्या पीक कर्ज वाटपापैकी ५९ हजार कर्जदारांकडे चक्क ६६६ कोटी रुपये थकीत आहेत. या थकबाकीदारांविरोधात जिल्हा बँकेने विशेष मोहीम राबवली आहे. या प्रयत्नातून आतापर्यंत ४८ कोटी रुपये वसूल झाले आहेत. ३१ मार्चअखेर बहुतांशी थकबाकी वसुलीचे जिल्हा बँक प्रशासनाचे प्रयत्न असणार आहेत.
जिल्हा बँकेने गेल्या वर्षभरापासून थकबाकी वसुलीसाठी कठोर मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये बड्या थकबाकीदारांवरही कारवाई करून वसुलीला प्राधान्य दिले जात आहे. जिल्हा बँक स्वत: थेट कर्जवाटप करत आहे. या कर्जाच्या थकबाकी वसुलीसाठी बँकेकडून लगेच कारवाई केली जात आहे. पण, जिल्ह्यातील विकास सोसायट्यांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या कर्ज वसुलीला अनेक अडथळे निर्माण होत आहेत. विकास सोसायट्यांच्या माध्यमातून दिलेल्या कर्जापैकी ५९ हजार कर्जदारांनी ६६६ कोटी रुपये अद्याप भरलेले नाहीत. या कर्जदारांना कारवाईच्या वारंवार नोटीसही बजावल्या आहेत. पण शासनाने निवडणुकीत कर्जमाफीची घोषणा केली होती.
शासनाकडून कर्जमाफी होईल, म्हणून अनेक कर्जदारांनी कर्जच भरले नाही. यातूनच जिल्ह्यातील ५९ हजार कर्जदारांनी ६६६ कोटी रुपये थकीत ठेवले आहेत. या कर्जदारांकडील ६० टक्के कर्ज हे मागील आर्थिक वर्षातील असून, ४० टक्के कर्ज जुने आहे. या कर्जदारांकडील कर्ज वसुलीसाठी तीन हजार शेतकऱ्यांच्या मालमत्तांचा लिलाव विकास सोसायट्यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेने सुरू केला आहे. या कारवाईमुळे आतापर्यंत ४८ कोटी रुपये वसूल झाले आहेत, अशी माहिती जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.
तीन हजार कर्जदारांवर जप्तीची कारवाई
विकास सोसायट्यांमार्फत दिलेल्या पीक कर्जदारांपैकी ५९ हजार थकबाकीदार आहेत. या थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई चालू आहे. आतापर्यंत तीन हजार कर्जदारांवर जप्तीची कारवाई चालू आहे. अन्य कर्जदारांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे परवानगी मागितली आहे, असेही सीईओ शिवाजीराव वाघ म्हणाले.
जिल्हा बँकेने थकबाकी कमी करून उत्पन्न वाढवण्यास प्राधान्य दिले आहे. या आर्थिक वर्षात बँकेचा नफा २०० कोटींहून अधिक झाला पाहिजे, असे आमचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार सर्वच छोट्या-मोठ्या थकबाकीदारांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. ५९ हजार कर्जदारांकडील ५० टक्केपेक्षा जास्त थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न चालू आहेत. - शिवाजीराव वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक, सांगली