जिल्ह्याच्या जीएसटी महसुलात ६६७ टक्के वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:11 AM2021-05-04T04:11:31+5:302021-05-04T04:11:31+5:30
सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सुरू झालेला लॉकडाऊन करवसुलीवर परिणाम करणाारा ठरेल अशी शक्यता व्यक्त होत असतानाच सांगली जिल्ह्यात ...
सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सुरू झालेला लॉकडाऊन करवसुलीवर परिणाम करणाारा ठरेल अशी शक्यता व्यक्त होत असतानाच सांगली जिल्ह्यात जीएसटीच्या महसुलाने नवा उच्चांक गाठला आहे. मागील एप्रिलच्या तुलनेत यंदा तब्बल ६६७ टक्के अधिक जीएसटी वसूल झाला आहे.
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात जून २०२० पासून सुरू झालेला जीएसटी वाढीचा ट्रेंड नोव्हेंबर २०२० चा अपवाद वगळता एप्रिल २२०१ पर्यंत कायम राहिला. सांगली जिल्ह्याच्या एप्रिल २०२१ च्या जीएसटी संकलनात मागील एप्रिलच्या तुलनेने सात पटीने वाढ दिसून येत आहे. एप्रिल २०२० मध्ये जीएसटी वसुली ११ कोटी इतकी होती. एप्रिल २०२१ मध्ये ८४.३४ कोटी जीएसटी वसुली झाली. जीएसटी महसुलात ७३.३५ कोटींची म्हणजेच ६६७ टक्के वाढ झाली आहे.
सांगली जिल्ह्यात २५ हजार करदाते आहेत. त्यापैकी राज्य शासनाकडे १६ हजार तर केंद्र शासनाकडे ९ हजार करदाते आहेत. जिल्ह्यात साखर उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात महसूल या विभागाला मिळाला. साखरेचे वाढलेले दर व वाढलेला पुरवठा यामुळे या उद्योगाकडून महसूल मिळाला.
मागील कालखंडात केलेले लेखापरीक्षण, १०० कोटींवर असलेल्या करदात्यांसाठी अनिवार्य केलेले ई-इन्वॉइस, ई-वे बिल तपासाची तीव्र मोहीम आदी उपाययोजना तसेच बोगस बिले करणाऱ्यांवर मोठ्या कारवाया करण्यात आल्या. सांगलीत भंगार, मोबाइल, प्लायवुड व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर कर भरून घेतला गेला. तसेच विवरणपत्रात भरलेली माहिती इतर ऑनलाइन माहितीशी पडताळून कर भरणा करून घेतला गेला. त्याचाही परिणाम महसुलात दिसत आहे.
जिल्ह्यात २५ हजारांपेक्षा जास्त करदाते असले तरी विवरणपत्र भरण्याचे प्रमाण कमी होते, मात्र सहापेक्षा जास्त विवरणपत्रे न सादर केलेल्या करदात्यांची नोंदणी रद्द करण्याच्या मोहिमेमुळे त्यांना मिळणाऱ्या आयटीसी व कर परताव्यांवर बंधने आली. तसेह ई-वे बिल तयार करता येत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाल्याने अशा करदात्यांनी आपला थकीत कर भरून नोंदणी नियमित करून घेतली आहे.