महावितरणचा वीज ग्राहकांना दरवाढीचा दुहेरी झटका; सुरक्षा ठेवीसोबत इंधन अधिभाराचा बोजा
By संतोष भिसे | Published: May 20, 2024 05:50 PM2024-05-20T17:50:31+5:302024-05-20T17:50:58+5:30
देशात सर्वाधिक दर
विटा : महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या बहुवार्षिक वीज दरवाढ मंजुरीनुसार दि. १ एप्रिल २०२४ पासून वीजदरात सरासरी ७ ते ८ टक्के वाढ झाली आहे. त्यामध्ये पुन्हा अतिरिक्त सुरक्षा ठेव आणि वाढीव इंधन अधिभाराचा बडगा उगारला आहे. त्यामुळे ग्राहकांना वीज दरवाढीचा दुहेरी झटका बसला आहे. ग्राहकांतून तीव्र संताप व्यक्त हाेत आहे.
महावितरणने एप्रिल २०२४ च्या वीज बिलात प्रतियुनिट १५ पैशांपासून एक रूपयापर्यंत वाढीव इंधन अधिभाराची आकारणी केली आहे. त्याद्वारे छुपी दरवाढ लादली आहे. पूर्वी सरासरी वीज वापराच्या एक महिन्याच्या रकमेइतकी सुरक्षा ठेव बंधनकारक होती. २०२२ पासून नियामक आयोगाने ही ठेव दोन महिन्यांच्या बिलाइतकी घेण्यास महावितरणला परवानगी दिली. त्यानुसार मार्चअखेरीस प्रत्येक ग्राहकाच्या वार्षिक वीज वापराचे अवलोकन केले जाणार आहे. वाढीव वापरानुसार कमी पडणारी रक्कम अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून स्वतंत्र बिलाद्वारे एप्रिलपासून मागणी केली जात आहे.
राज्यातील सामान्य वीज ग्राहकांचा विचार करता ९९ टक्के ग्राहक वेळेवर बील भरणा करतात. केवळ एक टक्का अप्रामाणिक व मुदतीत बील न भरणाऱ्या ग्राहकांसाठी ९९ टक्के ग्राहकांना वेठीस धरून अन्याय केला जात आहे.
देशात सर्वाधिक दर
राज्यातील सामान्य वीज ग्राहकांबरोबरच व्यापारी, औद्योगिक ग्राहकांचे वीज दर देशात सर्वाधिक झाले आहेत. एकाच वेळ दरवाढ, इंधन अधिभाराची आकारणी व अतिरिक्त सुरक्षा ठेवीमुळे थेट १५ टक्के वीज दरवाढ लादली गेली आहे. शासनाने यात तातडीने लक्ष घालून विजेचे दर कमी करावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे सदस्य किरण तारळेकर यांनी केली आहे.