आटपाडीच्या ५ वर्षीय चिमुकल्याने सर केले कळसुबाई शिखर : १६४६ मीटर उंचीचे शिखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:26 PM2019-11-27T12:26:28+5:302019-11-27T12:26:50+5:30
अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर सर्वजण पुन्हा खाली निघण्यास निघाले. तेव्हाही षण्मुख पायीच संपूर्ण शिखर उतरून खाली आला.
आटपाडी : षण्मुख अमोल हिंडे या पाचवर्षीय चिमुकल्याने आई-बाबांसोबत महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई हे शिखर सर केले. षण्मुख हा आटपाडीतील डायनामिक इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बालवाडीत शिकतो. आटपाडी तहसील कार्यालयातील लिपिक निशिगंधा हिंडे यांचा तो मुलगा आहे.
आई, वडील व षण्मुख कळसुबाई शिखर पाहण्यासाठी गेले होते. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असतानाच षण्मुख ‘मी चालत शिखर चढणार’ असा हट्ट करू लागला. त्याचा निश्चय पाहून तेथील मार्गदर्शकदेखील त्याचे कौतुक करायला लागले. सुरुवातीला गंमत म्हणून आई-वडिलांनीही त्याला परवानगी दिली. पण तो शेवटपर्यंत पायीच चढून गेला. दुपारी साडेबारा वाजता सर्वजण कळसुबाई शिखरावर पोहोचले. अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर सर्वजण पुन्हा खाली निघण्यास निघाले. तेव्हाही षण्मुख पायीच संपूर्ण शिखर उतरून खाली आला.
१६४६ मीटर उंच असलेल्या या कळसुबाई शिखरावर चढाई करण्याचा विचारच अनेकांच्या मनात धडकी भरवतो. अनेकजण अर्ध्यातूनच परतत असतात. असे असताना पाच वर्षाच्या षण्मुखने केलेली चढाई कौतुकाचा विषय बनली आहे.