पाडव्याला ७0 कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:08 PM2018-03-18T23:08:03+5:302018-03-18T23:08:03+5:30
सांगली : साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्यादिवशी (रविवारी) खरेदीचा अमाप उत्साह संपूर्ण शहरात दिसून आला. चांगला मुहूर्त आणि सुटीचा आनंद व्दिगुणीत करत विविध गोष्टींची विक्रमी खरेदी ग्राहकांकडून झाली. ७० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.
उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्याने एसी (वातानुकूलित यंत्र), कुलरना मागणी होती, तर यंदा आटाचक्की, दुचाकी वाहने व वॉटर प्युरिफायरची (आरओ) चांगली विक्री झाली. सोने खरेदीसाठी सराफ बाजार फुलून गेला होता. मराठी वर्षाची सुरुवात आणि दिवाळीनंतरचा सर्वात मोठा सण म्हणून गुढीपाडव्याकडे पाहिले जाते. त्यामुळे यावर्षी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापाºयांनी वेगवेगळ्या स्कीमची रेलचेल केली होती. त्यास ग्राहकांनी प्रतिसाद देत खरेदीचा अमाप उत्साह दाखविला. त्यामुळे तब्बल ७० कोटींच्या उलाढालीची गुढी रविवारी उभारली गेली. यामध्ये सर्वाधिक उलाढाल दुचाकी आणि चारचाकी वाहने, शेतीउपयोगी वाहनांची झाली. त्याखालोखाल मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना मागणी होती. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने यावेळी कुलर आणि एसी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल दिसून आला. आटाचक्कीला चांगली मागणी होती.
शहरातील विविध दुचाकी शोरूममधून मोठ्या प्रमाणावर पाडव्याच्या मुहूर्तावर वाहनांचे वितरण करण्यात आले. पंधरा दिवस अगोदर बुकिंगची प्रक्रिया सुरू होती. तीन हजारहून अधिक दुचाकींची विक्री झाली.
दरवर्षीच गुढीपाडव्याला इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये कुलर आणि एसीला मागणी असते. त्याखालोखाल मोबाईलची उलाढाल झाली. मोबाईलमध्ये रॅम आणि रॉम अधिक असणारे मोबाईल आणि विशेषत: सेल्फीच्या सर्वाधिक पिक्सेलचा कॅमेरा असलेल्या मोबाईलला अधिक पसंती मिळाली. ग्राहकांचा फायनान्स योजनेकडे जादा ओढा होता.
महिलांच्या औत्सुक्याचा विषय असलेल्या सोने खरेदीसाठी रविवारी चांगली गर्दी झाली होती. सध्या लग्नसराईचेही दिवस असल्याने त्यामुळेही सोने खरेदीत वाढ झाली होती. शहरातील सराफ बाजाराबरोबरच विश्रामबाग परिसरात दुकानातही मोठी गर्दी होती. ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. सराफ बाजार ते गणपती पेठ आणि कापडपेठेपर्यंत वाहतुकीची कोंडी होती. सायंकाळी उशिरापर्यंत खरेदीसाठी उत्साह दिसून आला.
सोन्याची : सुवर्णझळाळी
गुढीपाडव्याच्या महूर्तावर सोने खरेदीचा उत्साह दरवर्षी दिसून येतो. यंदाचा द्राक्ष व ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, त्यामुळेही शेतकरी वर्गाकडून खरेदीला प्राधान्य दिले जाते. बिले अजून मिळाली नसली तरी तडजोड करून खरेदी केली जाते. यंदा अशाच उत्साहात सांगलीच्या सराफ बाजारात पाच कोटींहून अधिक उलाढाल झाली आहे. सोन्याचे दागिने खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल दिसून आला. दिवसभर येथील सराफ बाजार व शहरातील विविध भागातील दुकानांमध्ये गर्दी दिसून आली.