सांगलीत ‘ऑनलाईन बझार’चा सात हजार ग्राहकांना गंडा, कोट्यवधीचा घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 04:56 PM2022-06-03T16:56:25+5:302022-06-03T16:57:05+5:30
ग्राहकांनी ऑनलाईन पैसे भरून मालाचे बुकिंग केल्यानंतरही दोन महिने त्यांना माल पोहोच झालेला नाही.
सांगली : शहरालगतच्या एका ऑनलाईन बझारने ॲपद्वारे नोंदणी असलेल्या सुमारे सात हजार ग्राहकांना कोट्यवधीचा गंडा घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ग्राहकांनी ऑनलाईन पैसे भरून मालाचे बुकिंग केल्यानंतरही दोन महिने त्यांना माल पोहोच झालेला नाही. बझारच्या कस्टमर केअरसह अन्य संपर्क क्रमांकांवर प्रयत्न केल्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांची चिंता वाढली आहे. काहींनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
सांगली शहराजवळ काही वर्षांपूर्वी हा बझार सुरू करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी स्वत:च्या ॲपवरून नोंदणी सुरू केली. सवलतीच्या आकर्षक जाहिराती करून ग्राहकांना जाळ्यात ओढले. घरगुती ग्राहकांसह छाेट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी माल घेण्यास सुरुवात केली. काही वर्षे वेळेत व योग्यपद्धतीने मालाचा पुरवठा करणाऱ्या या बझारची सेवा गेल्या सहा महिन्यांपासून बिघडली.
ॲपवरून ऑनलाईन मालाचे बुकिंग व आगाऊ पैसे भरूनही माल मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांनी कस्टमर केअरसह बझारकडे तक्रारी सुरू केल्या. तक्रारींचा ओघ वाढल्याने बझारच्या संचालकांनी संबंधित संपर्क क्रमांकावरून प्रतिसाद देणे बंद केले. विशेष म्हणजे नियम व अटींमध्ये कंपनीचे हे ॲप प्रायोगिक तत्त्वावर सुरु केले असल्याचे नमूद केले आहे.
ऑनलाईन ऑर्डर रद्दनंतरही परतावा नाही
प्राथमिक अंदाजानुसार बझारकडून पैसे भरूनही माल न मिळालेले सुमारे सात हजार लोक आहेत. यातील अनेकांना ऑनलाईन ऑर्डर रद्द करण्याची सूचना बझारने केली होती. काहींनी ऑनलाईन ऑर्डर रद्द केल्यानंतरही पैसे परत मिळाले नाहीत. ॲपच्या ग्राहक प्रतिसाद (कस्टमर रिव्ह्यू) वर ग्राहकांनी तक्रारींचा पाऊस पाडला आहे. हे ॲप व हा बझार कसा फसवा आहे, हे त्यावर मांडले आहे.
पोलिसांत एकही तक्रार नाही
दोन ते तीन हजार रुपये अडकलेल्यांची संख्या अधिक असून किरकोळ रकमेसाठी पोलिसांत कशाला जायचे, म्हणून अद्याप कोणीही तक्रार दिलेली नाही.
अडीच हजाराचा तेलाचा डबा १९९९ मध्ये
ज्यावेळी १५ किलो खाद्यतेलाचा डबा बाजारात २५०० रुपयांना येत होता, त्यावेळी या बझारने तो १९९९ रुपयांना देण्याची जाहिरात केली होती. एप्रिलमध्ये त्यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केली. त्यामुळे एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाचे बुकिंग करण्यात आले आहे.
न पटणाऱ्या ‘ऑफर’
गहू, डाळींच्या दरात प्रतिकिलो ३ ते ५ रुपयांची सवलत, अडीच हजाराच्या खरेदीवर २२ रुपये दराने ५ ते ३०० किलोपर्यंतची साखर, दहा हजार रुपयांच्या खरेदीवर दोन हजार रुपयांचा पिंप फ्री अशा सहजासहजी न पटणाऱ्या ‘ऑफर’ या बझारने दिल्या होत्या. सुरुवातीस घरपोच माल देऊन विश्वास संपादन केला होता.