जिल्ह्यातील ७१०६६ शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:06 AM2021-01-13T05:06:14+5:302021-01-13T05:06:14+5:30
सांगली : दुष्काळी तालुक्यांसह जिल्ह्यातील दहा तालुक्यात सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे एक लाख २१ हजार ८३ शेतकऱ्यांच्या पिकांचे हजारो ...
सांगली : दुष्काळी तालुक्यांसह जिल्ह्यातील दहा तालुक्यात सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे एक लाख २१ हजार ८३ शेतकऱ्यांच्या पिकांचे हजारो कोटीचे नुकसान झाले आहे. यापैकी केवळ ५० हजार १७ शेतकऱ्यांना दोन कोटी ३६ लाख सात हजार रुपयांचे वाटप झाले आहे. अद्याप ७१ हजार ६६ शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत.
जिल्ह्यात गेल्या तीस वर्षातील सर्वाधिक पाऊस सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झाला. दुष्काळी भागातील ओढे, नद्यांना महापूर आला. हातातोंडाशी आलेली खरीप पिके वाहून गेली तर काही पिकांमध्ये सतत पाणी राहिल्यामुळे कुजून गेली. भाजीपाला शेतातच सडला होता. या पिकांचे जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून अहवाल पाठविला होता. त्यानुसार पहिले पंचनामे झालेल्या ५० हजार १७ शेतकऱ्यांसाठी शासनाकडून २३ कोटी ६० लाख सात हजार रुपयांचे अनुदान वाटप झाले आहे. ऑक्टोबरमध्ये पुन्हा सर्वेक्षण केल्यानंतर ७१ हजार ६६ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार पंचनामे करून ४० कोटी २० लाख ३९ हजार ९०० रुपयांच्या निधीची मागणी केली होती. राज्य शासनाकडून दोन दिवसापूर्वी २३ कोटी ६० लाख सहा हजार रुपये आले आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोट
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे आर्थिक नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचे वाटप झाले आहे. परंतु, अद्याप अनेक शेतकऱ्यांना मदत मिळाली नसून शासनाने तातडीने मदतीचे वाटप करण्याची गरज आहे. सध्या रब्बी पिकांना खते, औषध फवारणीसाठी पैशांची गरज आहे.
- अरविंद पाटील, शेतकरी, सोनी, ता. मिरज.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. शासनाकडून आलेल्या निधीचे वाटप झाले आहे. उर्वरित ७१ हजार ६६ शेतकरी शिल्लक असून त्यांच्यासाठी ४० कोटी २० लाख ३९ हजार ९०० रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी २३ कोटी ६० लाख सहा हजार रुपये मिळाले आहेत. त्याचेही तात्काळ वाटप होणार आहे.
- मौसमी बर्डे, निवासी उपजिल्हाधिकारी, सांगली.