सिध्देवाडी तलावात ७२ टक्के पाणीसाठा

By admin | Published: November 5, 2014 09:48 PM2014-11-05T21:48:18+5:302014-11-05T23:43:26+5:30

गतवर्षीपेक्षा कमी साठा : अंजनी तलाव ७५ टक्के रिक्त

72% water supply in Siddhevadi lake | सिध्देवाडी तलावात ७२ टक्के पाणीसाठा

सिध्देवाडी तलावात ७२ टक्के पाणीसाठा

Next

प्रवीण पाटील - सावळज -तासगाव पूर्व भागाला वरदान ठरलेला सिद्धेवाडी तलाव यावर्षी पूर्ण क्षमतेने भरणार नसल्याचे चित्र आहे. ३०२.९५ दशलक्ष घनफूट एवढी क्षमता असणाऱ्या सिद्धेवाडी तलावामध्ये आजअखेर २०२.६२ दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा पावसाच्या पाण्याने झालेला आहे. विसापूर-पुणदी योजनेचे पाणी सिद्धेवाडी तलावामध्ये दाखल झाले. मात्र योजनेच्या उदघाटनापुरतेच पाणी तलावात आले आहे. त्यामुळे या पाण्याचा उपयोग पाणीसाठा वाढण्यात फारसा झालेला नाही. पावसाळा संपल्याने व अग्रणी नदी व ओढ्यांचे पाणी कमी झाल्यामुळे तलाव भरणार नसल्याचे चित्र आहे. गतवर्षी चांगल्या पावसाने तलाव १०० टक्के भरला होता. मात्र यंदा पाऊस कमी झाल्यामुळे तलाव ७२ टक्के भरला आहे.
सिद्धेवाडी तलावामधून सध्या पेड प्रादेशिक, सावळज व परिसरातील गावांना पिण्यासाठी पाण्याच्या योजना पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात झपाट्याने पाणी साठ्यात घट होणार आहे. शिवाय शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणीही शेतकऱ्यांची होणार आहे. त्यामुळे विसापूर-पुणदी योजनेचे पाणी सोडून तलाव १०० टक्के भरून घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
७४.१५ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या अंजनी तलावामध्ये १८.०७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. म्हणजे सध्या तलावात फक्त २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सिद्धेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पाटाच्या सहाय्याने पाणी अंजनी तलावामध्ये नेण्यात येते. मात्र सिद्धेवाडी तलावच यंदा न भरल्यामुळे अंजनी तलावात पाणी नेण्यात आलेले नाही. अंजनी तलावामध्येही म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याची सोय आहे. त्यामुळे म्हैसाळ योजनेचे पाणी अंजनी तलावात सोडून तलाव भरुन घेण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
गतवर्षी सिद्धेवाडी तलावातील पाणी तलावाखालील गावांना शेतीसाठी सोडत असताना वायफळे, सिद्धेवाडी, दहीवडी व बिरणवाडीतील शेतकऱ्यांनी विरोध करीत जॅकवेलमध्ये दगड टाकून पाणी अडवले होते. अगोदर सिद्धेवाडी तलावात पाणी आणा व मग खालील गावांना पाणी सोडा, अशी मागणी शेतकऱ्यांची होती; पण आता विसापूर-पुणदी योजना पूर्ण होऊन पाणी आले होते. त्यामुळे योजनेचे पाणी सोडून तलाव भरल्यास त्याखालील गावांना पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचाही विरोध असणार नाही.
निवडणुकीपुरतेच पाणी?
डोळ्यासमोर विधानसभा निवडणुका ठेवून या योजनेचे काम गतीने करून उद्घाटन घेण्यात आले. मात्र त्यानंतर थोड्याच दिवसात या योजनेचे पाणी बंद झाले. त्यामुळे निवडणुकीसाठीच फक्त पाणी आले होते काय? असा सवाल या भागातील शेतकरी विचारत आहेत.

Web Title: 72% water supply in Siddhevadi lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.