राज्यातील ७३ ऐतिहासिक तीर्थस्थळांचा होणार कायापालट, पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त ‘नमो तीर्थस्थळ सुधार’ अभियान
By संतोष भिसे | Published: November 17, 2023 12:26 PM2023-11-17T12:26:50+5:302023-11-17T12:27:18+5:30
मंदिरांच्या देखभालीसाठी पाच भक्तांची समिती नियुक्त केली जाणार
संतोष भिसे
सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३व्या वाढदिवसानिमित्त राज्य शासनातर्फे ‘नमो तीर्थस्थळ सुधार’ अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत राज्यभरातील ७३ ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा करण्यात येणार आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील पाच स्थळांचा समावेश आहे. कोल्हापूर व रत्नागिरीतील प्रत्येकी एक व साताऱ्यातील दोन तीर्थस्थळांचाही कायापालट केला जाईल.
शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत मंदिरांचा जीर्णोद्धार, भाविकांसाठी प्राथमिक सुविधा उपलब्ध करणे, परिसराचे सुशोभीकरण, डिजिटल दर्शन आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शासनाने निश्चित केलेल्या ७३ ऐतिहासिक स्थळांमध्ये मंदिरे, बारव, ऐतिहासिक इमारती, तलाव यांचा समावेश आहे. त्यांचा इतिहास सांगणारे फलक क्यू आर कोडसह दर्शनी भागात लावले जाणार आहेत. मंदिरांच्या देखभालीसाठी पाच भक्तांची समिती नियुक्त केली जाणार आहे. ३१ ऑगस्ट २०२४ अखेर ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य आहे.
सांगलीतील पाच स्थळे
सांगली जिल्ह्यातील पाच ऐतिहासिक मंदिरांचा कायापालट केला जाणार आहे. यामध्ये माहुली (ता. खानापूर) येथील काळम्मादेवी मंदिर, बेळंकी (ता. मिरज) येथील महादेव मंदिर, आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील आगळेश्वर मंदिर, इरळी (ता. कवठेमंकाळ) येथील महादेव मंदिर आणि कुची (ता. कवठेमहांकाळ) येथील महादेव मंदिर यांचा समावेश आहे. या ठिकाणी लवकरच कामे सुरू होणार आहेत. या कामांत वास्तूविशारद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे.
कोल्हापूर, सातारा, रत्नागिरीतही तीर्थस्थळ अभियान
आरे (ता. करवीर) येथील महादेव मंदिर, कातरखटाव (जि. सातारा) येथील कात्रेश्वर मंदिर, किकली (ता. वाई) येथील भैरवनाथ मंदिर, कसबा संगमेश्वर (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील कर्णेश्वर मंदिर यांचाही जीर्णोद्धार केला जाणार आहे. जिल्हा वार्षिक योजना, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, विभागीय निधी आणि नियमित निधी या माध्यमातून यासाठी खर्च केला जाईल.