ग्रामपंचायतींमध्ये ७५ कोटींवर अपहार रमेश सहस्रबुध्दे : पाच तालुक्यांमध्ये कपात करूनही कर्मचाºयांचा फंड भरलाच नाही; सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:33 AM2018-01-17T00:33:27+5:302018-01-17T00:35:49+5:30
सांगली : शिराळा, जत, आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये सुमारे १५०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या पगारातून फंडाची ८.३३ टक्के रक्कम कपात केल्यानंतरही ती भविष्य निर्वाह विभागाच्या कार्यालयाकडे भरलीच नाही. गेल्या दहा वर्षांतील फंडाची रक्कम ७५ कोटींहून जास्त आहे, असा आरोप आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉ. रमेश सहस्रबुध्दे आणि जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस कॉ. अॅड. आर. एन. जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले की, ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या पगारातून ८.३३ टक्के रक्कम कपात केल्यानंतर ती भविष्य निर्वाह विभागाच्या कार्यालयात भरण्याची गरज आहे. शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायतीनेही त्यांच्या हिश्श्याची ८.३३ टक्के रक्कम लगेच भविष्यनिर्वाह निधी विभागाच्या कार्यालयाकडे तात्काळ भरण्याची गरज आहे. ग्रामपंचायतींकडे चौकशी केली असता, पाच तालुक्यातील ग्रामपंचायतींनी कर्मचाºयांची कपात केलेली रक्कम शासनाकडे जमा केली आहे. परंतु, काही ग्रामपंचायतींनी स्वत:चा हिस्सा कर्मचाºयांच्या फंडाच्या खात्यात जमा केला नाही. हा घोटाळा वेगळाच आहे. याचा आम्ही शोध घेत आहोत.
शिराळा, जत, आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींनी कर्मचाºयांच्या पगारातून कपात केली आहे. प्रत्यक्षात कर्मचाºयांनी चौकशी केली असता, ती भविष्य निर्वाह निधी विभागाच्या कार्यालयाकडे जमाच नाही. या रकमेवर संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि काही अधिकाºयांनीही डल्ला मारला आहे. अपहाराची रक्कम ७५ कोटींहून अधिक होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे. फौजदारी संहिता कलम १९७ या कायद्यानुसार ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाºयांवर फौजदारी कारवाईची परवानगी द्यावी, अशीही मागणी केली आहे. अद्याप त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या प्रश्नासह जिल्हा परिषद वर्ग तीन, चारच्या कर्मचाºयांच्या भरतीत ग्रामपंचायत कर्मचाºयांना सेवाज्येष्ठतेनुसार ५० टक्के नेमणुका द्या, चतुर्थश्रेणी कर्मचाºयाप्रमाणे वेतन, भत्ते, रजा, सुट्या आदी सेवा लागू करण्यांसह विविध मागण्यांसाठी दि. २२ जानेवारीरोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे, असा इशारा सहस्रबुध्दे व अॅड. जाधव यांनी दिला.
या मोर्चात कॉ. रमेश सहस्रबुध्दे, अध्यक्ष कॉ. दादासाहेब झुरे, अॅड्. आर. एन. जाधव, कॉ. नवनाथ मोहिते, कॉ. यल्लाप्पा कोळी, कॉ. अनिल पाटील, कॉ. बलराम सावंत, कॉ. विठ्ठल काळे, कॉ. संतोष मुळीक, कॉ. माणिक देसाई, कॉ. पांडुरंग पाटील, कॉ. गजानन शेरीकर, कॉ. सय्यद नदाफ, कॉ. सुनील जंगम आदी सहभागी होणार आहेत.