सांगली जिल्ह्यातील ७५,३७१ विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत-साडेचार कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 11:42 PM2018-07-12T23:42:50+5:302018-07-12T23:43:28+5:30
शाळा सुरू होऊन महिना झाला तरीही जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते आठवीच्या वर्गातील ७५ हजार ३७१ विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे
अशोक डोंबाळे।
सांगली : शाळा सुरू होऊन महिना झाला तरीही जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते आठवीच्या वर्गातील ७५ हजार ३७१ विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शासनाकडून गणवेशासाठी ४ कोटी ५२ लाखांचा निधी मिळूनही तो जिल्हा परिषदेकडून शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग झालेला नाही.
शासनाच्यावतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येते. पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीतील आणि दारिद्र्यरेषेखालील मुलांना मोफत गणवेश देण्यात येतो. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार त्यांच्या गणवेशासाठी लागणारा निधी देण्यात येतो. गतवर्षी हा निधी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता;
मात्र यावर्षी शाळेच्या पहिल्यादिवशी म्हणजे दि. १५ जूनला मुलांना गणवेशाचा निधी मिळालाच नाही. यावर्षी शिक्षण विभागाने गणवेशाचा निधी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांच्या संयुक्त बँक खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय घेतला. मात्र शाळा सुरू होऊन महिना झाला तरीही तो निधी वर्ग झालेला नाही.
जिल्ह्यातील ७५ हजार ३७१ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ४ कोटी ५२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ही रक्कम गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर संबंधित शाळांच्या बँक खात्यामध्ये पाठविण्यात येणार आहे. काही शाळांमध्ये चौकशी केल्यानंतर, विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नसल्याचे समजले आहे.
याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी, शासनाकडून निधी आला असून, तो गटशिक्षणाधिकाºयांच्या खात्यावर चार दिवसांत जमा करणार असल्याचे सांगितले.शाळा सुरु होण्यापूर्वी शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके आणि गणवेश देण्याची घोषणा केली होती. पण प्रत्यक्षात महिन्याचा कालावधी होऊनही गणवेश मिळालेले नाहीत.
ओळखीच्या दुकानदारांचा शोध
एका विद्यार्थ्याला दोन गणवेश दिले जात होते. यासाठी पूर्वी प्रत्येक गणवेशामागे दोनशेप्रमाणे ४०० रुपये मिळत होते. त्यात १०० रुपयांची वाढ करुन ३०० रुपये, म्हणजे एका विद्यार्थ्याला ६०० रुपये अनुदान दिले जात आहे. कमी किमतीत गणवेश कसे बसतील, यासाठी ओळखीचा कापड दुकानदार शोधण्यात मुख्याध्यापक, शिक्षकांची ताकद खर्ची पडणार आहे.