Lok Sabha Election 2019 चोवीस लाख बोटांसाठी ७६ लिटर शाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:22 PM2019-04-18T23:22:43+5:302019-04-18T23:23:09+5:30
शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : एरवी ‘डाग’ कोणालाच आवडत नाहीत. मात्र, मतदानानंतर बोटावरील शाईचा ‘डाग’ दाखविण्याचा ...
शरद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : एरवी ‘डाग’ कोणालाच आवडत नाहीत. मात्र, मतदानानंतर बोटावरील शाईचा ‘डाग’ दाखविण्याचा आनंद काही औरच असतो. मतदान केल्याची खूण म्हणून मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईच्या ३ लाख बाटल्या राज्यात आणण्यात आल्या आहेत. त्यातील ७५५२ बाटल्या सांगली व हातकणंगले मतदारसंघासाठी पाठविण्यात आल्या आहेत. दोन्ही मतदारसंघातील २३ लाख ६३ हजार १२८ मतदारांच्या तर्जनीवर एकूण ७६ लिटर शाईचा वापर करण्यात येणार आहे.
मतदानाचा दिवस जवळ येत असल्याने प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असणारे बहुतांश साहित्य प्रशासनाला प्राप्त झाले असून ते तालुकापातळीवर पाठविण्यातही आले आहे. या असंख्य साहित्यापैकी महत्त्वाची म्हणजे शाई. मतदान केल्यानंतर मतदाराच्या तर्जनीवर निळी शाई लावण्यात येते. सांगली मतदारसंघ व हातकणंगले मतदारसंघातील शिराळा व इस्लामपूर मतदारसंघासाठी साहित्य देण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आहे. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात साहित्य पुरवठा करण्यात आला आहे.
प्रत्येक बुथवर दोन शाईच्या बाटल्या ठेवण्यात येणार आहेत. एका बाटलीमध्ये १० मि.लि. निळी शाई असते. या एका बाटलीमधून किमान ३५० मतदारांच्या तर्जनीवर निळ्या शाईचे निशाण लावण्यात येईल. २००४ च्या निवडणुकीवेळी मतदान करणाºया मतदारांच्या बोटावर निळ्या शाईचा एक ठिपका लावण्यात येत होता. मात्र, २००६ पासून निवडणूक आयोगाने ठिपक्याऐवजी सरळ रेषा आखण्याचे निर्देश दिल्याने शाई जास्त लागत आहे. त्यादृष्टीने जादा शाईचा पुरवठा करण्यात आला आहे.
कोणत्या बोटावर लागते शाई
मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. जर तर्जनीवर शाई लागलेली नसेल, तर त्या मतदाराला मतदान करू दिले जात नाही.
म्हैसूरची शाई
संपूर्ण देशात मतदानाच्या वेळी म्हैसूरची शाई वापरण्यात येते. येथील एका वॉर्निश कंपनीमध्ये ती तयार होते. या कंपनीपासून जगातील २५ देशांना निवडणूक शाईचा पुरवठा केला जातो. ही शाई तर्जनीवर लावल्यानंतर अजिबात पुसता येत नाही, अशी या शाईची ख्याती आहे.