महापालिकेच्या शिबिरात ७८ जणांनी घेतले परवाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:24 AM2021-03-28T04:24:59+5:302021-03-28T04:24:59+5:30
चार दिवसांच्या या विशेष शिबिरातून महापालिकेकडे ६ लाख ६७ हजारांचा महसूल जमा झाला आहे. अजूनही अनेक व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाचे ...
चार दिवसांच्या या विशेष शिबिरातून महापालिकेकडे ६ लाख ६७ हजारांचा महसूल जमा झाला आहे. अजूनही अनेक व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाचे परवाने घेतलेले नाहीत त्यामुळे महापालिकेचा परवाना नसणाऱ्या व्यवसायांवर १ एप्रिलपासून व्यवसाय सीलची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे.
महापालिका क्षेत्रात जवळजवळ ९२ प्रकारच्या व्यवसायांना महापालिकेच्या आरोग्य विभागाचा परवाना आवश्यक आहे. यापैकी अनेक व्यवसाय हे महापालिकेच्या परवान्याशिवाय सुरू असल्याची बाब समोर येताच महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी ३१ मार्चपर्यंत अशा व्यवसायांना सुलभतेने परवाना देण्यासाठी २३ ते २६ मार्चदरम्यान व्यवसाय परवाना शिबिर घेण्याचे आदेश आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांना दिले होते. यानुसार २३ ते २६ मार्चदरम्यान सांगली, मिरज आणि कुपवाड अशा तिन्ही ठिकाणी व्यवसाय परवाना शिबिर घेण्यात आले. या शिबिरास व्यावसायिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या शिबिरात ७८ जणांनी व्यवसाय परवाने घेतले आहेत, तर ७२ व्यवसायांचे परवाने नूतनीकरण करण्यात आले आहेत. या शिबिरातून महापालिकेला ६ लाख ६७ हजारांचा महसूल प्राप्त झाला आहे. अजूनही अनेक व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाचे परवाने घेतलेले नाहीत, त्यामुळे महापालिकेचा परवाना नसणाऱ्या व्यवसायांवर १ एप्रिलपासून कारवाई केली जाणार असल्याचा इशारा कापडणीस यांनी दिला आहे.