नववी, अकरावीचे ७८ हजार विद्यार्थी थेट वरच्या वर्गात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:27 AM2021-04-08T04:27:55+5:302021-04-08T04:27:55+5:30
सांगली : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिल्यानंतर आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश देण्याचा ...
सांगली : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिल्यानंतर आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील नववीचे ४५ हजार २७२, तर अकरावीचे ३३ हजार ३४९ अशा मिळून ७८ हजार ६२१ विद्यार्थ्यांना परीक्षेविना थेट वरच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. दरम्यान, शासनाच्या या निर्णयावर काही शिक्षक, पालकांनी नाराजी व्यक्त केली.
मागील १५ दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना सरसकट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय विभागाने यापूर्वीच जाहीर केला आहे. त्यानंतर नववी आणि अकरावीच्या वर्गांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. नववीतील विद्यार्थ्यांच्याही शाळा यंदा ऑनलाइनच झाल्या आहेत. बहुतेक ठिकाणी प्रात्यक्षिके, सत्र परीक्षा, चाचणी परीक्षा झालेल्या नाहीत. अकरावीचे वर्गच नोव्हेंबरनंतर सुरू झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे, असा पेच शिक्षण विभागासमोर होता.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया जानेवारीपर्यंत सुरू होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अवघ्या दोन-तीन महिन्यांत परीक्षेला बसवायचे का, असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला होता. ऑनलाइन वर्गात अद्याप ५० ते ६० टक्केच अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील नववीचे ४५ हजार २७२ तर अकरावीचे ३३ हजार ३४९ असे मिळून ७८ हजार ६२१ विद्यार्थ्यांना परीक्षेविना थेट वरच्या वर्गात प्रवेश मिळणार असल्याचे शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी सांगितले.
चौकट
ऑनलाइन परीक्षेला अडथळेच जास्त
राज्यातील अनेक शाळांमध्ये व ग्रामीण भागात संगणक सुविधा व इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. यामुळे अनेक तांत्रिक अडचणी उद्भवू शकतात. यासाठी शहरातील विद्यार्थ्यांबरोबरच राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची तुलना न करता परीक्षा ऑफलाइन घ्यावी, अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटना, पालक संघटना यांच्या प्रतिनिधींनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचे आदेश दिले.