सांगली जिल्ह्यातून घरपट्टी, पाणीपट्टीचे ७९ कोटी वसूल, विशेष मोहिमेमुळे वसुलीस गती
By अशोक डोंबाळे | Published: April 25, 2023 06:44 PM2023-04-25T18:44:19+5:302023-04-25T18:44:36+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीचाही झाला फायदा
सांगली : जिल्ह्यातील ६९८ ग्रामपंचायतींकडून घरपट्टीचे ४७ कोटी २१ लाख आणि पाणीपट्टीचे ३२ कोटी २ लाख ५४ हजार रुपयांची वसुली झाली आहे. लोकअदालत, ग्रामपंचायतींनी विशेष मोहीम राबविल्यामुळे आणि ग्रामपंचायत निवडणुकीमुळे घरपट्टी, पाणीपट्टी वसुली चांगली झाली आहे.
जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात ५५ कोटी ८० लाख ४४ हजार रुपये घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट होते. यापैकी पूर्वीची थकबाकी ७ कोटी ७५ लाख ५३ हजार आणि चालूचे ४७ कोटी ४६ लाख ३८ हजार रुपयांचा समावेश आहे. यापैकी ४७ कोटी २१ लाख रुपये वसूल झाले असून ते प्रमाण ८४.६० टक्के आहे. तसेच पाणीपट्टीचे ३७ कोटी ६२ लाख २० हजार रुपये वसुलीचे उद्दिष्ट होते. यामध्ये पूर्वीची थकबाकी ५ कोटी ६ लाख ८९ हजार, ३२ कोटी ५५ हजार ३१ हजारांचा समावेश आहे. यापैकी ३२ कोटी २ लाख ५४ हजार रुपये वसूल झाले असून ८५.१२ टक्के वसुलीचे प्रमाण आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमार्फत गावपातळीवर आपापल्या कार्यक्षेत्रातील कुटुंबांकडून घरपट्टी, पाणीपट्टी व दिवाबत्ती कराची वसुली करण्यात येते. त्यानुसार दरवर्षी मार्चपर्यंत जास्त कर वसूल करण्यासाठी प्रयत्न होतात. यासाठी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात अधिकाधिक वसुली करण्यावर भर दिला जातो. यंदा मात्र याच महिन्याच्या १४ तारखेपासून सर्वच सरकारी कर्मचारी हे बेमुदत संपावर गेले होते. हा संप आठवडाभर चालल्यामुळे आणि काही सरकारी सुट्यांमुळे मार्च महिन्यातील केवळ दहा दिवस हे कर वसुलीसाठी मिळाले. याचा परिणाम हा करवसुलीवर झाला आहे. परिणामी कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आल्याचे दिसत आहे.
लोकअदालतींचा करवसुलीसाठी मदत : तानाजी लोखंडे
गेल्या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कराची ५५ कोटी ८० लाख ४४ हजार रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ठेवले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वर्षभरात तीन ते चार लोकअदालतींचे आयोजन केले होते. या लोकअदालतींचा फायदा हा ग्रामपंचायत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी झाल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे यांनी सांगितले.
अशी झाली वसुली (रक्कम लाखात)
तालुका - घरपट्टी - पाणीपट्टी
वाळवा - ९०२.९१ - ६२५.३६
पलूस - ४०७.६३ - ३३९.३९
खानापूर - ३०५.४५ - १९८.१४
तासगाव - ३६१.८२ - ३०१.०७
जत - ४४२.०८ - १८०.५६
मिरज - ९२१.५८ - ६४२.६५
शिराळा - २८७.६० - २८६.९१
कडेगाव - ३८५.२० - २१९.१०
आटपाडी - ३६०.१० - २३६.७०
क.महांकाळ - ३४५.९१ - १७२.६६
एकूण - ४७२.१३ - २०२.५४