‘सिव्हिल’च्या दुरुस्तीसाठी आठ कोटींचा प्रस्ताव सादर
By admin | Published: January 18, 2016 11:24 PM2016-01-18T23:24:30+5:302016-01-18T23:30:27+5:30
इमारतीची रंगरंगोटी : दरवाजे, खिडक्या बदलणार
सचिन लाड --सांगली ,येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या (सिव्हिल) इमारत दुरुस्तीसाठी सुमारे आठ कोटी रुपयांची गरज आहे. तसा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य शासनाला सादर केला आहे. पण त्याला अजूनही मंजुरी मिळालेली नाही. रुग्णालयाच्या इमारतीची रंगरंगोटी, दरवाजे व खिडक्या बदलल्या जाणार आहेत. जलवाहिनी खराब झाल्याने तीही बदलण्याची गरज असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे.
शासकीय रुग्णालयाच्या इमारतीस पन्नास वर्षे होऊन गेली आहेत. जुनी इमारत सुस्थितीत आहे. पण त्याच्याभोवती भाजलेल्या रुग्णांचा कक्ष, रक्तपेढी, शवविच्छेदन विभाग, क्षयरोग, संसर्गजन्य विभाग, रुग्णांचे स्वतंत्र वॉर्ड, धोबीघाट या विभागांच्या इमारती आहेत, त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. शवविच्छेदन विभाग रुग्णालयाच्या मागे आहे. हा विभाग आतून स्वच्छ आहे. दुर्गंधीही येत नाही. पण त्याच्या खिडक्या, दरवाजे गंजले आहेत. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे आत काय सुरू आहे, हे सहजपणे दिसून येते. दररोज दोन- तीन मृतदेहांची विच्छेदन तपासणी केली जाते. मृतदेहांच्या सुरक्षेच्यादृष्टीने या विभागाची दुरुस्ती महत्त्वाची आहे. रुग्णांच्या वॉर्ड विभागाचीही अशीच अवस्था आहे. पाठीमागील बाजूच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. भिंतींना तडे गेले आहेत. पाणीपुरवठ्याची वाहिनी फुटल्याने पाणी मुरून भिंती शेवाळल्या आहेत.
संसर्गजन्य विभाग व रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय असलेल्या धर्मशाळेची इमारतही जुनी दिसू लागली आहे. इमारतीचा रंग उडाला आहे. फरशा फुटलेल्या आहेत. छताला गळती लागल्याने पावसाळ्यात पाणी आत पडते. परिसरात झाडेझुडपे वाढली आहेत. भाजलेल्या रुग्ण कक्षाच्या खिडक्या फुटल्या आहेत. भिंतीत केवळ खिडकीचा आकार उरला आहे. नातेवाईक या खिडकीतूनच रुग्णांची भेट घेतात. रुग्णालयाकडे स्वतंत्र पाण्याची सोय आहे. यासाठी मोठी टाकीही बांधलेली आहे. पण ही टाकी व जलवाहिनी जुनी झाली आहे. सातत्याने गळती होत असल्याने पाणी पसरून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
रुग्णांच्या सुरक्षेचाही प्रश्न...
रुग्णांच्या वॉर्डात शौचालयाचे दरवाजे मोडले आहेत. खिडक्यांचा सांगाडाच शिल्लक आहे. पावसाळ्यात या खिडक्यांतूनही पाणी आत येते. इचलकरंजीतील एका रुग्णाने शौचालयाच्या खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केली होती. तत्पूर्वी एका रुग्णाच्या आत्महत्येचा प्रयत्न फसला होता. आणखी एकाने शौचालयाच्या खिडकीच्या गजाला टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रुग्णांच्या सुरक्षेच्यादृष्टीने ही इमारत धोक्याची ठरू लागली आहे. त्यामुळे तातडीने दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.