‘नगराध्यक्ष’साठी तासगावात ८ अर्ज
By admin | Published: July 12, 2014 12:15 AM2014-07-12T00:15:04+5:302014-07-12T00:19:39+5:30
बुधवारी निवड : चार उमेदवारांचे प्रत्येकी दोन अर्ज
तासगाव : तासगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेत आज (शुक्रवार) एकूण चार उमेदवारांचे आठ अर्ज दाखल करण्यात आले. छाननी प्रक्रियेत एकही अर्ज फेटाळला गेला नाही.
नगराध्यक्ष निवडीची विशेष सभा बुधवार दि. १६ रोजी पालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी, मिरज यांनी नुकताच जाहीर केला होता. त्यानुसार आज अर्ज दाखल करण्याच्या दिवशी गृहमंत्री आर. आर. पाटील गटाकडून शुभांगी साळुंखे, खा. संजयकाका पाटील गटाकडून बाबासाहेब पाटील व अविनाश पाटील, तर कॉँग्रेसकडून संजय पवार या उमेदवारांचे प्रत्येकी दोन असे आठ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
दि. १४ रोजी अर्ज माघारीची प्रक्रिया पार पडणार असून दि. १६ रोजी नगराध्यक्ष निवड होणार आहे. त्याचदिवशी सकाळी उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया होणार असून तीही निवड नगराध्यक्ष निवडीनंतर होणार आहे. आज पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी काम पाहिले.
निवडीच्या पार्श्वभूमीवर आठवड्याभरापासून शहरातील राजकारण तापले आहे. नगराध्यक्ष कुठल्या गटाचा होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. नगराध्यक्ष आपलाच झाला पाहिजे यासाठी मंत्री गट व खासदार गटाने जोरदार प्रयत्नही केलेले आहेत. त्यात पालिकेतील कॉँग्रेसचे एकमेव सदस्य संजय पवार यांनीही अर्ज दाखल करून या निवडणुकीतली रंगत वाढवली आहे.
दोन दिवसांपासून मंत्री गटात व खासदार गटातील बैठकांनी वेग घेतला होता. आज सकाळीही दोन्ही गटांच्या बैठका झाल्या. गटात कुणी अर्ज भरायचे, यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार पालिकेत येऊन सदस्यांनी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्यापूर्वी पालिकेत कोण-कोण येते, कसे राजकारण होते, याकडे नजरा लागून राहिल्या होत्या. आज दिवसभर या निवडीबाबतची चर्चा शहरभर सुरू होती. आता सोमवारी अर्ज कोण मागे घेणार व अंतिमत: मैदानात कोण राहणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)