सांगलीत आठ दुकाने फोडली
By admin | Published: January 2, 2017 11:41 PM2017-01-02T23:41:17+5:302017-01-02T23:41:17+5:30
मार्केड यार्डमध्ये धुमाकूळ : व्यापाऱ्यांत घबराट; मोबाईलसह २३ हजारांचा माल लंपास
सांगली : येथील मार्केट यार्डात रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत आठ दुकाने फोडली. मात्र, तीन दुकानांतून चोरट्यांच्या हाती केवळ २३ हजारांचा माल लागला. यामध्ये १२ हजारांची रोकड व दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल आहे. सोमवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
विक्रम जैन यांचे वर्षा सेल्स हे किराणा मालाचे दुकान, समीर शिवाणी यांचे शिवाणी एंटरप्रायझेस्, राकेश माहेश्वर यांचे आर्यन मसाला, संतोष चोप्रा यांचे जितेंद्र ट्रेडर्स, सत्यनारायण अट्टल, माजी महापौर सुरेश पाटील यांचे अडत दुकान, कऱ्हाड तालुका खरेदी-विक्री संघ, महावीर भन्सारी यांचे रामदेव ट्रेडर्स हे किराणा दुकान, अशी आठ दुकाने फोडून चोरट्यांनी विश्रामबाग पोलिसांना आव्हानदिले आहे. सर्व दुकाने फोडताना शटर्सची कुलुपे कटावणीने उचकटून आत प्रवेश केला. तोडलेली कुलुपे दुकानाबाहेर सापडली आहेत.
आठ दुकाने फोडल्याची घटना घडूनही विश्रामबाग पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता. जैन यांच्या दुकानातून तीन हजाराची रोकड, शिवाणी यांच्या दुकानातून तीनशे रुपयांची चिल्लर, तर चोप्रा यांच्या दुकानातून दहा हजाराची चिल्लर व दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल, असा एकूण २३ हजार तीनशे रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. अन्य पाच दुकानांत मात्र त्यांना काहीच मिळाले नाही.
सोमवारी सकाळी नऊ वाजता व्यापारी दुकाने उघडण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संतोष चोप्रा यांच्या दुकानातून रोकड व मोबाईल लंपास केला असला तरी, एका तिजोरीत लॅपटॉपही होता. चोरट्यांनी तो खाली काढून ठेवला आहे. मात्र, तो नेला नाही. गोदामात दुचाकी होती. त्याला चावीही लावलेली होती. तीही चोरट्यांनी नेली नाही. (प्रतिनिधी)