सांगली: टीईटी घोटाळ्यातील ८ शिक्षक बडतर्फ, ऑगस्टपासून पगार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 01:47 PM2022-08-24T13:47:38+5:302022-08-24T13:48:20+5:30
टीईटी परीक्षेतील उत्तीर्ण आणि माध्यमिक शिक्षक म्हणून सेवेत असलेल्या जिल्ह्यातील १९७ शिक्षकांची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी शासनाकडे पाठविली होती.
सांगली : टीईटी घोटाळाप्रकरणी जिल्हा परिषदेने प्राथमिकच्या ६ व माध्यमिकच्या २ अशा एकूण ८ शिक्षकांना बडतर्फ केले. दोषी आढळलेल्यांना आता कारवाईमुळे कधीच शिक्षक होता येणार नाही. संबंधित शिक्षकांचा ऑगस्टचा पगारही थांबविला आहे.
टीईटी घोटाळा प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेने जाहीर केली आहे. यात राज्यातील सात हजार ८७४ उमेदवारांचा समावेश आहे. संबंधित उमेदवारांची टीईटीची प्रमाणपत्रे रद्द करण्यासह त्यांना यापुढील टीईटी देण्यास कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्यात आला आहे.
या टीईटी गैरप्रकारात सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाकडील सहा व माध्यमिक विभागातील २ अशा आठ शिक्षकांचा समावेश आहे. यामध्ये दोन प्राथमिक शिक्षकांच्या कागदपत्रात त्रुटी असल्यामुळे ते नियुक्त झाले नाहीत. उर्वरित सहा शिक्षक मात्र सेवेत कार्यरत होते. या शिक्षकांचा ऑगस्टचा पगार थांबविण्यात आला आहे. तसेच त्यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ केले आहे, अशी माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली आहे.
‘माध्यमिक’च्या दोघांवर कारवाई
टीईटी परीक्षेतील उत्तीर्ण आणि माध्यमिक शिक्षक म्हणून सेवेत असलेल्या जिल्ह्यातील १९७ शिक्षकांची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी शासनाकडे पाठविली होती. यापैकी तासगाव तालुक्यातील एक आणि कुपवाड येथील एका शिक्षकाला सेवेतून बडतर्फ करून शिक्षण विभागाने मान्यता रद्द केली आहे.