ताकारी-म्हैसाळ योजनेसाठी ८ हजार २७२ कोटींचा अहवाल मंजूर, पूर्णत्वाचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 11:27 AM2022-12-30T11:27:09+5:302022-12-30T11:29:56+5:30
ताकारी योजनेचे २७ हजार हेक्टर तर मूळ आणि विस्तारित म्हैसाळ योजनेचे एकंदरीत ८१ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार
प्रताप महाडिक
कडेगाव : ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्प योजनेसाठी ८ हजार २७२ कोटी ३६ लाख इतक्या किंमतीच्या पाचव्या सुधारित प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये प्रत्यक्ष कामासाठी रुपये ७ हजार ५०९ कोटी तर अनुषंगीक खर्चासाठी ७६२ कोटींचा समावेश आहे. दोन्ही योजनांसाठी आवश्यक निधीची तरतूद असून योजनांच्या पूर्णत्वाचा मार्ग मोकळा झाला आहे.
कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प जि. सांगली या प्रकल्पाच्या जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सन २०२१-२२ च्या दरसूचीवर आधारित ही मान्यता देण्यात आली आहे. रविवार दि. १८ डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय झाला होता. गुरुवार दि. २९ डिसेंबर रोजी या शासन निर्णयानुसार जलसंपदा विभागाने अध्यादेश काढला आहे.
कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ स्तरावर कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत ताकारी म्हैसाळ योजनेच्या कामांसाठी दि. २ ऑगस्ट २०१७ रोजी सन २०१३-१४ दरसुचीवर आधारीत रुपये ४ हजार ९५९ कोटी किमतीच्या चतुर्थ सुधारित अहवालास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.
मात्र आता दरसूचीतील बदलामुळे झालेली वाढ, जास्त दराची निविदा स्विकृती, भुसंपादनाच्या किंमतीतील वाढ, नविन भुसंपादन कायद्यामुळे भूसंपादनाच्या किमतीत झालेली वाढ, संकल्पचित्रातील बदलामुळे झालेली वाढ, अपुऱ्या तरतूदीमुळे झालेली वाढ व इतर अनुषंगीक खर्चामुळे प्रकल्प किंमतीत वाढ झाली. त्यामुळे महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाने पाचव्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनास सादर केला होता.
यावर मंत्रीमंडळाने आवश्यक ती कार्यवाही करून दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाच्या अंतर्गत ताकारी व म्हैसाळ सिंचन योजनेचे काम पूर्णत्वास नेण्याच्या उद्देशाने जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सन २०२१-२२ च्या दरसूचीवर आधारीत रुपये ८२७२.३६ कोटी किमंतीच्या पाचव्या सुधारित प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेतला. यामुळे दोन्ही योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ताकारी योजनेचे २७ हजार हेक्टर तर मूळ आणि विस्तारित म्हैसाळ योजनेचे एकंदरीत ८१ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
ताकारीला १३२२ कोटींची मंजुरी
पाचव्या सुधारित प्रशासकीय अहवालातील ८ हजार २७२ कोटी ३६ लाख इतक्या अंदाजित प्रकल्प खर्चापैकी केवळ ताकारी योजनेसाठी १३२२ कोटींची मंजुरी मिळाली आहे. ताकारी योजनेसाठी आजवर ९५० कोटी रुपये इतका खर्च झाला.अजूनही ३७२ कोटी रुपये इतका निधी योजनेच्या पूर्णत्वासाठी मिळणार आहे.
म्हैसाळला ६ हजार ९५९ कोटींची मंजुरी
पाचव्या सुधारित अहवालानुसार म्हैसाळ योजनेसाठी ६ हजार ९५९ कोटी रुपये इतका अंदाजित खर्च मंजूर झाला आहे.मुळ म्हैसाळ योजनेसाठी आजवर ३ हजार ४५९ कोटी इतका खर्च झाला आहे.आता मूळ योजनेसाठी १ हजार कोटी तर विस्तारित योजनेसाठी २ हजार ५०० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.