सांगलीचे ८० कामगार सुदानमध्ये अडकले, सुटकेसाठी सरकारकडे साकडे 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 11:52 AM2023-04-28T11:52:42+5:302023-04-28T11:53:17+5:30

आफ्रिका खंडातील सुदान देशात गेल्या काही दिवसांपासून गृहयुद्धाला सुरुवात

80 Sangli workers stuck in Sudan, appeal to government for rescue | सांगलीचे ८० कामगार सुदानमध्ये अडकले, सुटकेसाठी सरकारकडे साकडे 

सांगलीचे ८० कामगार सुदानमध्ये अडकले, सुटकेसाठी सरकारकडे साकडे 

googlenewsNext

सांगली : आफ्रिका खंडातील सुदान देशात गेल्या काही दिवसांपासून गृहयुद्धाला सुरुवात झाली आहे. या देशात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढत मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू केले आहे. तेथील साखर कारखान्यांमध्ये कामासाठी गेलेले सांगली जिल्ह्यातील ८० कामगारही अडकले आहेत. यात पलूस आणि तासगाव तालुक्यातील नागरिकांचा समावेश आहे. त्यांनी तेथून सुटका करण्याची मागणी केली आहे.

सुदानमध्ये गृहयुद्ध भडकत चालले असून, अनेक भारतीय तिथे अडकून पडले आहेत. यातील ३६० हून अधिकजणांना सुरक्षितपणे भारतात आणण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या वतीने हे अभियान राबविण्यात येत आहे. मात्र अजूनही अनेकजण सुटकेच्या प्रतीक्षेत असून, त्यात सांगली जिल्ह्यातील काहींचा समावेश आहे.

सूर्यगाव (ता. पलूस) येथील मधुकर पाटील यांच्या कुटुंबातील तीन व्यक्ती सुदानमध्ये असल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदानमधील केनाना शुगर कंपनीमध्ये हे सर्वजण कार्यरत आहेत. भारतीय दुतावासाच्या वतीने सुरू असलेल्या मदत क्षेत्रापासून ते अद्यापही बाराशे किलोमीटर दूर असल्याची माहिती आहे. यामुळेच त्यांनी एक व्हिडीओ तयार करून सुदानमधून सुटकेची मागणी भारत सरकारकडे केली आहे.

युद्धजन्य परिस्थिती पाहता भारतीयांना घेऊन जाण्यासाठी सुरू असलेल्या केंद्राजवळ पोहोचणे धोकादायक आहे, असे त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. त्यामुळे सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पलूस, तासगाव तालुक्यांसह कर्नाटकातील उगार भागातील नागरिक तिथे आहेत.

जयंत पाटील यांची परराष्ट्र मंत्र्यांकडे मागणी

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना ट्विट करीत मदतीची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यातील १०० जण सुदानमध्ये अडकले असून, त्यांच्यापर्यंत अद्याप मदत पोहोचलेली नाही. आपल्या विभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वांना सुरक्षितपणे भारतात आणले जावे.

‘लोकमत’चा थेट सुदानमध्ये संपर्क

सुदानमध्ये असलेल्या तानाजी पाटील यांच्याशी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, रबाक शहराशेजारी केनाना शुगर फॅक्टरी आहे. यात ३६४ भारतीय कामगार आहेत. यात सांगली जिल्ह्यातील किमान ८० जण आहेत. मदत केंद्रापासून हा कारखाना दूर असल्याने व बाहेरील वातावरणही असुरक्षित असल्याने मदत मिळण्यास अडचणी येत आहेत.

Web Title: 80 Sangli workers stuck in Sudan, appeal to government for rescue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली