७ कोरोना रुग्णांसाठी ८०० कर्मचारी! मिरज कोविड रुग्णालयातील चित्र; संपूर्ण रुग्णालय वेठीस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 06:21 AM2022-03-07T06:21:49+5:302022-03-07T06:21:59+5:30
कोरोनाची तिसरी लाट सुरू होताच, रुग्णालय फक्त कोरोनाबाधितांसाठी राखीव करण्यात आले. तिसऱ्या लाटेत जिल्ह्याची रुग्णसंख्या साडेपाच हजारांवर गेली; पण त्यातील ५००० रुग्ण घरगुती विलगीकरणातच राहिले.
- संतोष भिसे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरज कोविड रुग्णालयात अवघ्या सात कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी तब्बल ८०० कर्मचारी गुंतून पडले आहेत. म्हणजे एका रुग्णासाठी ११५ कर्मचारी काम करीत आहेत. सध्या फक्त कोरोनाग्रस्तांसाठीच रुग्णालय खुले असल्याने ही अवस्था उद्भवली आहे. रुग्णालय अन्य रुग्णांसाठीही तातडीने खुले करण्याची मागणी होत आहे.
कोरोनाची तिसरी लाट सुरू होताच, रुग्णालय फक्त कोरोनाबाधितांसाठी राखीव करण्यात आले. तिसऱ्या लाटेत जिल्ह्याची रुग्णसंख्या साडेपाच हजारांवर गेली; पण त्यातील ५००० रुग्ण घरगुती विलगीकरणातच राहिले. शासकीय रुग्णालयात फक्त ४५० आणि खासगी रुग्णालयात ५० रुग्ण दाखल झाले. सध्या तर रुग्णालयात फक्त सातच रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्या सेवेसाठी ११० डॉक्टर्स, ६०० हून अधिक परिचारिका आणि ९० अन्य कर्मचारी तीन पाळ्यांत काम करीत आहेत.
रुग्णालयाचा सोनोग्राफी, सीटी स्कॅन व एमआरआय विभागही यातच गुंतून पडला आहे. तीनही शस्त्रक्रियागृहे काम नसल्याने बंद ठेवावी लागली आहेत. सांगोला, कवठेमहांकाळपासून येणारे सर्व रुग्ण सांगलीला पाठविले जात आहेत. प्रसूतीसाठी गर्भवतींना सांगलीला पाठविले जात आहे. यामुळे सांगलीतील शासकीय रुग्णालयावर प्रचंड ताण आहे.
कौलग्याच्या रुग्णाची ससेहोलपट
कौलगे (ता. तासगाव) येथील एक रुग्ण दोन दिवसांपूर्वी मिरज रुग्णालयात आला होता. तेथे फक्त कोरोना रुग्णावर उपचार होत असल्याने सांगलीला पाठविण्यात आले. सांगलीत आल्यानंतर सीटी स्कॅन करण्यासाठी पुन्हा मिरजेला पाठविले. तेथून परत सांगलीला आला. यामध्ये संपूर्ण दिवस गेला. प्रचंड ससेहोलपट झाली.
भविष्यात चौथी लाट आलीच तर त्यांच्यासाठी मिरज कोविड रुग्णालयात स्वतंत्र विभाग व यंत्रणा तयार करावी, जेणेकरून संपूर्ण रुग्णालय वेठीस धरले जाणार नाही. पाच-दहा रुग्णांसाठी महिन्याला काही कोटींचा खर्च करणे योग्य नाही.
- सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच
मिरजेचे रुग्णालय सर्वसामान्य रुग्णांसाठी खुले करण्याचा विचार सुरू आहे. याबाबतचा निर्णय एक-दोन दिवसांतच होईल. कोरोना रुग्ण थोडेच असले, तरी त्यांच्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करणे तूर्त शक्य नाही.
- डॉ. सुधीर नणंदकर, अधिष्ठाता,
मिरज शासकीय रुग्णालय