जिल्ह्यात तीन नगरपंचायतींसाठी ८२ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 07:00 PM2021-12-21T19:00:44+5:302021-12-21T19:07:02+5:30
आता १९ जानेवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदानाची आकडेवारी जाहीर होताच तिन्ही नगरपंचायत कार्यक्षेत्रात निकालावरुन पैजा लावण्यात येत आहेत
सांगली : जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या खानापूर, कडेगाव व कवठेमहांकाळ नगरपंचायतींसाठी मंगळवारी चुरशीने एकूण सरासरी ८२ टक्के मतदान झाले. तिन्ही नगरपंचायतींच्या एकूण १२५ उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी मतदान यंत्रात बंद झाले. आता १९ जानेवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तिन्ही नगरपंचायतीसाठी सकाळपासून मतदारांत उत्साह दिसून आला. दुपारी तीन वाजेपर्यंतच तिन्ही नगरपंचायतीसाठी ६५ ते ७० टक्के मतदान झाले होते. काही केंद्रांवर सकाळी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, तर दुपारनंतर अनेक केंद्रे ओस पडली होती. सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच या वेळेत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खानापूरसाठी सर्वाधिक ८५.५२ टक्के मतदान झाले असून कवठेमहांकाळसाठी ८२ तर कडेगावला ७९.९३ टक्के मतदान झाले.
तिन्ही नगरपंचायतींत एकूण १२५ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येकी १३ जागांसाठी निवडणूक झाली असून प्रत्येक ठिकाणी उमेदवारांची गर्दी आहे. राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस व शिवसेना या चारही पक्षांनी निवडणुकीसाठी ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे निवडणुकीत चूरस निर्माण झाली आहे.
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वांच्या नजरा १९ रोजी होणाऱ्या निकालाकडे लागली आहे. जानेवारीतच उर्वरीत प्रत्येकी चार जागांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर एकत्रित मतमोजणी केली जाणार आहे.
या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे नेते कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, शिवसेनेचे आ. अनिल बाबर, माजी मंत्री अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीच्या आ. सुमनताई पाटील, त्यांचे पुत्र रोहित पाटील, भाजपचे खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख आदी दिग्ग्ज नेत्यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
गावांमध्ये पैजा रंगल्या
मतदानाची आकडेवारी जाहीर होताच तिन्ही नगरपंचायत कार्यक्षेत्रात निकालावरुन पैजा लावण्यात येत आहेत. आतापासूनच राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांत निकालाबाबत उत्सुकता दिसून येत आहे.