सांगलीकरांना दिलासा!, महापालिकेचे करवाढ नसलेले ८२३ कोटींचे अंदाजपत्रक सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 11:35 AM2024-03-01T11:35:17+5:302024-03-01T11:35:37+5:30

आयुक्तांकडून नव्या योजनांसाठी तरतूद

823 crore budget of Sangli Municipal Corporation without tax increase | सांगलीकरांना दिलासा!, महापालिकेचे करवाढ नसलेले ८२३ कोटींचे अंदाजपत्रक सादर

सांगलीकरांना दिलासा!, महापालिकेचे करवाढ नसलेले ८२३ कोटींचे अंदाजपत्रक सादर

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांनी गुरुवारी २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता ८२३ कोटी रुपयांचा कोणतीही करवाढ नसलेला व शिकलीचा अर्थसंकल्प सादर केला. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पुढील वर्षभरात कोणताही अतिरिक्त कर द्यावा लागणार नाही.

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच प्रशासकीय अंदाजपत्रकच अंतिम अंदाजपत्रक असणार आहे. आयुक्त तथा प्रशासक असलेल्या सुनील पवार यांनी अनेक महत्त्वाकांक्षी योजनांसाठी कोट्यवधी रुपयांची तजवीज करून वास्तवदर्शी आकड्यांचा विचार करून अर्थसंकल्प सादर केला असल्याचे स्पष्ट केले. स्थायी समितीच्या सभागृहात पार पडलेल्या सभेत लेखाधिकारी अभिजित मेंगडे यांनी प्रशासकीय अर्थसंकल्प आयुक्त सुनील पवार यांच्याकडे सादर केला.

यावेळी नगर सचिव चंद्रकांत आडके उपस्थित होते. मागील तीन वर्षांतील कर संकलनाचे आकडे गृहीत धरून अंदाजपत्रकात समावेश केला. त्यांनी २०२३-२४चा ९८१ कोटींचे सुधारित अंदाजपत्रकही मांडले. जमा व खर्चाचा विचार करता २९ लाख ५३ हजार रुपये शिल्लक अपेक्षित धरण्यात आली आहे.

यावेळी आयुक्त म्हणाले की, नागरिकांवर कोणताही कराचा अतिरिक्त बोजा आम्ही टाकलेला नाही. उत्पन्नवाढीचे अनेक उपाय शोधताना शिक्षण व आरोग्याच्या अनेक योजना वर्षभरात राबविण्यात येतील. त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. प्रदूषणमुक्त शहरांची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. आजवर बजेटमध्ये अवास्तव उत्पन्नाचे आकडे दाखवून खर्चाच्या वाढीव तरतुदी सदस्य मंडळाच्या काळात होत होत्या. आम्ही तीन वर्षांतील अंतिम बजेटमधील आकड्यांचा विचार करून वास्तवदर्शी संकल्प केला आहे.

असा आहे अर्थसंकल्प

  • अपेक्षित करसंकलन : ८२३ कोटी २८ लाख ४७ हजार ३१३
  • अपेक्षित खर्च : ८२२ कोटी ९९ लाख १२ हजार ३६
  • शिल्लक : २९ लाख ३५ हजार २७७

Web Title: 823 crore budget of Sangli Municipal Corporation without tax increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.