ताकारी-म्हैसाळ योजनांच्या ८२७२ कोटींच्या सुधारित खर्चास मंजूरी

By अशोक डोंबाळे | Published: January 26, 2024 07:37 PM2024-01-26T19:37:30+5:302024-01-26T19:37:53+5:30

सुरेश खाडे : बळीराजाला बळ देण्यासाठी सिंचन प्रकल्पांना भरीव निधी

8272 crore revised expenditure approved for Takari Mhaisal schemes | ताकारी-म्हैसाळ योजनांच्या ८२७२ कोटींच्या सुधारित खर्चास मंजूरी

ताकारी-म्हैसाळ योजनांच्या ८२७२ कोटींच्या सुधारित खर्चास मंजूरी

सांगली : शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अनेक कल्याणकारी योजना राज्य शासन राबवित आहे. ताकारी-म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाचवी सुधारीत आठ कोटी २७२ कोटी रुपये खर्चास मंजूरी मिळाली आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात डॉ. खाडे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर सर्व जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देवून संवाद साधताना ते बोलत होते. 
 यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, उपवनसंरक्षक नीता कट्टे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने, यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना भरीव निधीसह बळीराजाला बळ देण्यासाठी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्पास आठ हजार २७२ कोटी रुपयांची पाचवी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. या प्रकल्पातील म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजनेसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतामध्ये एक हजार ९३० कोटी रूपये मंजूर आहेत. त्यापैकी विविध कामांची ९८१ कोटींची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकूण ५७ किलोमीटरपैकी आठ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. 
तसेच, टेंभू विस्तारीत उपसा सिंचन प्रकल्पाला नुकतीच सव्वा सात हजार कोटींची सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सद्यस्थितीत या योजनेचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दोन्ही योजनांचे काम पूर्ण झाल्यानंतर जत तालुका दुष्काळमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
माहे नोव्हेंबर - डिसेंबर २०२३ मध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाईपोटी सुधारित शासन निर्णयानुसार वाढीव दराने तीन हेक्टरच्या मर्यादेत जिल्ह्याची एकूण ५८ कोटी रुपये अनुदान मागणी शासनाकडे केली आहे. एक रुपयामध्ये पीक विमा या योजनेतून आजअखेर ६२ हजार शेतकऱ्यांना जवळपास १७ कोटी रूपये अदा केले आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून चालू आर्थिक वर्षात विहित मुदतीत कर्ज फेडणाऱ्या ८६ हजार शेतकऱ्यांना जवळपास तेरा कोटी रूपये मंजूर केले. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ८१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे ४८२ कोटी रूपये वितरीत करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. 
 खाडे म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे एम. आर. आय. नवीन यंत्र खरेदीसाठी २५ कोटी तसेच वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे सी. टी. स्कॅन यंत्र खरेदीकरिता साडेदहा कोटी रूपये नुकतेच जाहीर करण्यात आले. दोन्ही मशिनची खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे. डीपीडीसीमधून विविध विभागांतील अत्याधुनिक यंत्रे व शस्त्रक्रिया साहित्य खरेदी केले आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ साठी एकूण ४७१ कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा प्रस्तावित केला असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, डीपीडीसीच्या निधीमधून जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अधिनस्त १० कार्यालयास जवळपास पावणेदोन कोटी रूपयांचे १५ अत्याधुनिक रोव्हर मशीन देण्यात आले आहेत. भूमि मोजणी प्रकरणांमधील विलंब कमी होऊन, जनतेला अचूक व जलद गतीने सेवा मिळेल. सांगली ते पेठ रस्त्याचे काम सुरू झाले असून, हा ४१ किलोमीटरचा संपूर्ण रस्ता चार पदरी होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
 जिल्ह्याचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा यांचा समावेश आहे. 
संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच, पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी देण्यास जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून, त्यामध्ये कोठेही कमी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. 
प्रारंभी राष्ट्रध्वजास सलामी देवून राष्ट्रगीत व राज्यगीत वादन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री डॉ. खाडे यांनी परेड निरीक्षण केले. प्रारंभी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली.
लष्करात कार्यरत असताना अपंगत्त्व आल्याने शुभम अनिल झांबरे (डोंगरसोनी, ता. तासगाव), रामदास संभाजी गरंडे (सिध्देवाडी, ता. मिरज) यांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते सानुग्रह अनुदान देण्यात आले. तसेच, शत्रूशी लढा देताना जखमी झालेले भरत अगतराव सरक (करगणी, ता. आटपाडी) यांना ताम्रपट प्रदान करण्यात आला. आवास योजना (ग्रामीण) मधील प्रथम तीन सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींचा तसेच मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल महापालिकेचा गौरव करण्यात आला. या समारंभास स्वातंत्र्य सैनिक उपस्थित होते. विजय कडणे व बाळासाहेब माळी यांनी सूत्रसंचालन केले. 


जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
 भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: 8272 crore revised expenditure approved for Takari Mhaisal schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली