पाच गुंठ्याला ८.३० लाख भाडे, तर २१ गुंठ्याला २.२३ लाख कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:49 AM2020-12-17T04:49:59+5:302020-12-17T04:49:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या मालकीच्या विजयनगर येथील पाच गुंठे जागेसाठी ८.३० लाख रुपये भाडे मिळाले, दुसरीकडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या मालकीच्या विजयनगर येथील पाच गुंठे जागेसाठी ८.३० लाख रुपये भाडे मिळाले, दुसरीकडे २१ गुंठे जागेसाठी महापालिकेने केवळ २.२३ लाख रुपये भाडे आकारणी केली आहे. या भाडेपट्टीचे गणित काय? असा सवाल नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी उपस्थित केला आहे.
काही दिवसांपूर्वी महापालिकेने प्रतापसिंह उद्यान व विजयनगर येथील जागांची ई-लिलाव पद्धतीने भाडे निश्चिती केली. प्रतापसिंह उद्यानातील जागेपोटी दोन लाख रुपये, तर विजयनगर येथील पाच गुंठे जागेसाठी ८.३० लाख रुपये वार्षिक भाड्याची बोली लागली होती. महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी हा निर्णय घेतला होता.
याचवेळी प्रशासनाने सांगली-मिरज रस्त्यावरील सिनर्जी हॉस्पिटलला ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी २१ गुंठे जागा भाडेपट्टीने दिली. या जागेपोटी केवळ २.२३ लाख रुपये भाडे आकारले. आता ही जागा भाडेपट्टीने देण्यास मंजुरीचा विषय महासभेसमोर ठेवण्यात आला आहे. दोन जागांच्या भाडेपट्टीत इतका फरक कसा काय? असा सवाल साखळकर यांनी केला आहे.
चौकट
कोट
सत्राळकर कॉम्प्लेक्सशेजारील ५ गुंठे खुल्या भूखंडाच्या ई-लिलावात वार्षिक भाड्यासाठी साडेआठ लाख रुपयांची बोली लागली आहे आणि दुसऱ्या बाजूला सिनर्जी हॉस्पिटलला २१ गुंठे भूखंडासाठी वार्षिक २.२८ लाख भाडे ठरवण्यात आले आहे. याचे लॉजिक काही कळले नाही. त्यामुळे हा विषय रद्द करून ई-लिलाव घेण्यात यावा.
- सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच.