दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पोलिसांना घडणार पंढरीची वारी!, बंदोबस्तासाठी रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 04:25 PM2022-07-01T16:25:38+5:302022-07-01T16:26:37+5:30
दोन वर्षांनंतर प्रथमच सांगली जिल्ह्यातील ८३३ पोलीस अधिकारी, कर्मचारी वारी बंदोबस्तासाठी रवाना झाले आहेत.
शरद जाधव
सांगली : कोरोना कहर आणि त्यामुळे दोन वर्षांपासून विस्कळीत बनलेले जनजीवन सुरळीत होत असल्याने उत्सवांमध्ये उत्साह जाणवत आहे. याचमुळे गेल्या दोन वर्षांपासून खंडित झालेली पंढरीची वारीही उत्साहात सुरु आहे. विठूरायाचा जप करत वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असतानाच, त्यांच्या बंदोबस्तासाठीही पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दोन वर्षांनंतर प्रथमच जिल्ह्यातील ८३३ पोलीस अधिकारी, कर्मचारी वारी बंदोबस्तासाठी रवाना झाले आहेत.
दरवर्षी आषाढी एकादशीच्या अगोदरच देहू आळंदीसह इतर भागातून वारकऱ्यांची पंढरपूरच्या दिशेने दिंडी सुरु होते. कोरोना कालावधीत याला मर्यादा आली होती. यंदा कोरोना रुग्णसंख्या नसल्याने मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले आहेत. संपूर्ण वारी कालावधीत पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येतो. यासाठी स्थानिक पोलिसांसह इतर जिल्ह्यातील पोलीसही पाचारण केले जातात. कोरोना कालावधीत जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची ‘पंढरीची वारी’ हुकली होती. यंदा मात्र, पुन्हा एकदा पोलीस कर्मचारी यात सहभागी झाले आहेत. त्यांना योग्य त्या सर्व सुविध पुरविण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी दिली.
पहिली तुकडी परतणार ५ जुलैला
वारी कालावधीत बंदोबस्तासाठी पोलिसांची जादा कुमक मागविली जाते. यंदाही देहू आळंदी, लोणंद आणि पंढरपूर असे बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. दोन टप्प्यात पोलीस कर्मचारी वारीत बंदोबस्तासाठी तैनात आहेत. यातील पहिली तुकडी ५ जुलैला जिल्ह्यात परतणार आहे तर उर्वरित कर्मचारी १३ तारखेनंतर बंदोबस्त पूर्ण करुन येणार आहेत.
सुखावणारा बंदोबस्त
पंढरीची वारीत वारकऱ्यांसह सहभागी प्रत्येकजण विठ्ठलनामात रंगून जातो. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनाही हा बंदोबस्त सुखावणारा असतो. वारकरी व स्थानिक ग्रामस्थांकडूनही सर्व सुविधा होत असल्याने वारीचा आनंद द्विगुणित होत असल्याचे बंदोबस्तासाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले.
बंदोबस्तासाठी तैनात कर्मचारी
- पोलीस उपअधीक्षक २
- पोलीस निरीक्षक ६
- उपनिरीक्षक ३०
- पोलीस कर्मचारी ७३५
- वाहतूक पोलीस ९०