जिल्ह्यातील ८४ टक्के रेशनकार्ड ‘आधार’शी संलग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:27 AM2020-12-31T04:27:38+5:302020-12-31T04:27:38+5:30
सांगली : रेशनकार्डाच्या माध्यमातून धान्य वितरण अधिक पारदर्शक होण्यासाठी लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल संलग्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ८४ ...
सांगली : रेशनकार्डाच्या माध्यमातून धान्य वितरण अधिक पारदर्शक होण्यासाठी लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल संलग्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ८४ टक्के रेशनकार्ड आधारशी संलग्न झाली आहेत. आता आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढवण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. ३१ जानेवारीपूर्वी शंभर टक्के लिंकचे काम पूर्ण होण्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबविण्यात येणार आहेे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली.
बारवे यांनी सांगितले की, ‘एक राष्ट्र, एकच रेशनकार्ड’ ही केंद्र सरकारची योजना असून शिधापत्रिकेस आधार सिडिंग १०० टक्के पूर्ण असणे हा या मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा आहे. भविष्यात देशातील कोणतीही व्यक्ती कोणत्याही ठिकाणी रेशनकार्डवर धान्य घेऊ शकणार आहे.
जिल्ह्यामध्ये प्राधान्य कुटुंब योजनेमधील तीन लाख ७९ हजार ९९ शिधापत्रिकेपैकी ८४ टक्के लाभार्थ्यांचे आधार सिडींग झाले असून दोन लाख ६९ हजार ५८० लाभार्थ्यांनी अजून त्यांचे आधार रेशनकार्डास जोडलेले नाही तसेच अंत्योदय अन्न योजनेतील ३१ हजार ७४० शिधापत्रिकांपैकी ८२ टक्के शिधापत्रिकेचे आधार सिडिंग पूर्ण झाले असून अद्याप २३ हजार ५७० लाभार्थ्यांनी अजून त्यांचे आधार रेशनकार्डास जोडलेले नाही.
त्यामुळे लाभार्थ्यांनी आपल्या दुकानदारांशी संपर्क साधून आधार व मोबाईल क्रमांक देऊन ई केवायसी करून घ्यावी, असे आवाहनही बारवे यांनी केले आहे.