जिल्ह्यात ८४ हजार विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत

By Admin | Published: July 8, 2015 11:47 PM2015-07-08T23:47:20+5:302015-07-08T23:47:20+5:30

पावणेतीन कोटींचा निधी वर्ग : शाळा समितीचे वीस दिवसांपासून दुर्लक्ष

84 thousand students waiting for uniform in the district | जिल्ह्यात ८४ हजार विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत

जिल्ह्यात ८४ हजार विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत

googlenewsNext

सांगली : जिल्हा परिषदेच्या शाळा सुरु होऊन वीस दिवस झाले तरीही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गणवेशांसाठी शासनाकडून २ कोटी ८२ लाख ८२ हजारांचा निधी मंजूर आहे. दि. २२ जूनरोजी प्रत्येक शाळास्तरावरील समितीकडे पैसेही वर्ग केले आहेत, मात्र शाळा व्यवस्थापन समितीने गणवेश खरेदी का केले नाहीत?, असा सवाल उपस्थित होत आहे.
मोफत गणवेशासाठी पहिली ते आठवीपर्यंतचे जिल्ह्यातील ८३ हजार ९०९ विद्यार्थी पात्र आहेत. या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियान योजनेतून मोफत गणवेश दिले जातात. यापैकी पहिली ते चौथीमध्ये अनुसूचित जाती व जमाती, विमुक्त व भटक्या जाती मुलींची जिल्ह्यात १८ हजार ६६७ संख्या आहे. पहिली ते चौथीमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व जमाती विद्यार्थ्यांची सात हजार ७४३ संख्या आहे. या विद्यार्थ्यांना गणवेश खरेदीसाठी शासनाने ५२ लाख ८२ हजारांचा निधी दिला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यास एकच गणवेश देण्यात येणार असून, गणवेशाची दोनशे रुपये किंमत आहे.
पहिली ते आठवीपर्यंतच्या दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांची ५७ हजार ४९९ संख्या आहे. यामध्ये अनुसूचित जाती व जमातीतील मुला-मुलींचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना गणवेशाचे दोन संच देण्यात येणार आहेत. यासाठी प्रति विद्यार्थी शासनाने चारशे रुपये अनुदान दिले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने २ कोटी ३० लाखांचा निधीही शाळा समित्यांना वर्ग केला आहे, असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांनी सांगितले.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या माहितीनुसार दि. २२ जून रोजीच गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे निधी वर्ग केला आहे. परंतु, हा निधी शाळा व्यवस्थापन समितीपर्यंत पोहोचला नसल्यामुळे गणवेश खरेदी थांबल्याचे सांगण्यात येत आहे. काहींना निधी मिळाला असूनही व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभारामुळे गणवेशाची खरेदी झालेली नाही. (प्रतिनिधी)

निधी केव्हाच पाठविला : सुगता पुन्ने
अनुसूचित जाती, जमाती आणि विमुक्त व भटक्या जातीमधील मुली आणि अनुसूचित जाती व जमातीच्या मुलांना मोफत गणवेश दिला जातो. गणवेश खरेदीसाठी शासनाकडून जिल्ह्यासाठी दोन कोटी ८२ लाख ८२ हजाराचे अनुदान मंजूर आहे. शासनाकडून मिळालेला निधी दि. २२ जून रोजीच गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे वर्ग केला आहे. शाळा व्यवस्थापनासही तातडीने गणवेश खरेदीच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी सुगता पुन्ने यांनी दिली.

Web Title: 84 thousand students waiting for uniform in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.