भोसरेतील सहा बंधाऱ्यांसाठी ८६ लाख
By admin | Published: May 11, 2017 11:08 PM2017-05-11T23:08:10+5:302017-05-11T23:08:10+5:30
भोसरेतील सहा बंधाऱ्यांसाठी ८६ लाख
लोकमत न्यूज नेटवर्क
औंध : ‘जलयुक्त शिवार योजना ही योजना राहिली नसून एक चळवळ बनली आहे. या चळवळीला बळ देण्यासाठी भोसरे येथे सहा बंधारे बांधण्यासाठी ८६ लाख रुपये उपलब्ध करून दिले जातील,’ असे आश्वासन सहपालक व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी
दिले.
कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खटाव तालुक्यातील भोसरे येथे श्रमदानातून सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेच्या ठिकाणच्या कामाला गुरुवारी सकाळी भेट दिली. यावेळी सदाभाऊ खोत यांनी श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थ, शेतकरी, कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये मनमोकळेपणे चर्चा करून श्रमदान केले. तसेच भोसरेतील ६ बंधाऱ्यांच्या कामासाठी ८६ लाखांचा निधी देण्याची घोषणा केली. शिवार फेरी काढून श्रमदान करणाऱ्या प्रत्येकाशी हितगूज साधले. विविध
कामांची माहिती घेतली व ग्रामस्थांच्या एकजुटीबद्दल समाधानही व्यक्त केले.
भोसरे गावच्या दक्षिणेस सुरू असलेल्या माती बांध, समतल चर काढणे, बंधारे, लूज बोल्डरच्या कामाची मंत्री खोत यांनी पाहणी केली. यावेळी कॉलेज युवक, युवतींनी आपले मनोगत व्यक्त केले. मंत्री
खोत यांनी उपस्थित विद्यार्थी, अधिकारी, ग्रामस्थांना दुष्काळाची व्यथा सांगणाऱ्या कविताही ऐकविल्या.
मागील एक महिन्यापासून या ठिकाणी सुमारे एक हजार नागरिक, महिला सकाळी व सायंकाळी सुमारे सात ते आठ तास श्रमदान करीत आहेत. यामाध्यमातून वॉटर कप स्पर्धेचे पारितोषिक मिळविण्याचा चंग भोसरेवासीयांनी बांधला आहे. या कामामुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडविले जाणार आहे. जिरविले जाणार आहे, याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर यावेळी पाहायला मिळत होता.
यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, अनिल देसाई, सागर खोत, संजय भगत, कृषी अधिकारी भुजबळ, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार प्रियांका पवार-कर्डिले, तालुका कृषी अधिकारी अरुण जाधव, मंडल कृषी अधिकारी अनिल महामुलकर, राजीव देशमुख, विजय वसव, पाटणे, विजय काळे व अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
झाडाखाली बसून पिठलं-भाकरीचा आस्वाद...
मंत्री खोत यांनी एका शिवारात झाडाखाली बसून दही-ठेचा, पिठलं-भाकरी खाण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी हाताने कांदा फोडून जेवणाचा आस्वाद घेतला. त्यांच्याबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व भाजपचे कार्यकर्तेही जेवण करण्यास बसले होते.