जिल्ह्यात ८६२ दृष्टिहीनांना मिळाली दृष्टी!
By admin | Published: June 9, 2016 11:14 PM2016-06-09T23:14:17+5:302016-06-10T00:19:07+5:30
तीनशेजण प्रतीक्षेत : दोन हजारजणांचे मरणोत्तर नेत्रदान; ‘सिव्हिल’चा पुढाकार
सचिन लाड -- सांगली --जिल्ह्यात नेत्रदानाची संकल्पना चांगल्याप्रकारे रुजत आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील २१६७ जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. नेत्रदानाच्या या संकल्पातून ८६२ अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली आहे. यासाठी सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाचे मोठे योगदान आहे. रुग्णालयाने मरणोत्तर नेत्रदानाविषयी अविनाश शिंदे यांची समुपदेशक म्हणून नियुक्ती केल्यानंतर मरणोत्तर नेत्रदानाचे प्रमाण वाढले आहे. अजूनही जिल्ह्यातील तीनशे अंध व्यक्ती दृष्टीच्या प्रतीक्षेत आहेत.मराठवाड्यातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या काळात सोयी-सुविधा नसतानाही त्यांनी लाखो नेत्र शस्त्रक्रिया करून अनेक अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त करुन दिली. नेत्रदानाबाबत प्रबोधन केले. राज्य शासनाने डॉ. भालचंद्र यांच्या मरणोत्तर १० जून हा नेत्रदान दिन घोषित केला आहे. माणसाच्या मृत्यूनंतर काही तास त्याचे अवयव जिवंत असतात. या काळात त्यांचे दान करणे गरजेचे असते. दुर्धर व्याधींनी ग्रासलेल्या व कृत्रिमरित्या अंधत्व आलेल्या लोकांना या अवयवांचा मोठा फायदा होतो. ज्या व्यक्तींना कृत्रिमरित्या अंधत्व आलेले असते, त्यांच्यासाठी हे नेत्रपटल अत्यंत उपयुक्त ठरतात. त्यांच्यावर केलेली बुबुळरोपण शस्त्रक्रिया यशस्वी होते. यातून ६० टक्के लोकांना नवी दृष्टी प्राप्त होते. अंध व्यक्तींच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी शासकीय यंत्रणा व सामाजिक संस्था, खासगी नेत्रपेढ्या प्रयत्न करीत आहेत. यासाठी समाजाने पुढाकार घेतला, तर नेत्रदान ही संकल्पना आणखी यशस्वी होऊ शकते.
जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात २१६७ लोकांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे. यामध्ये शासकीय रुग्णालयात मरणोत्तर नेत्रदान झालेल्यांची संख्या मोठी आहे. यातून ८६२ अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली आहे. मृत व्यक्तीच्या शरीरातील डोळे हा महत्त्वाचा अवयव असतो. त्याचे दान झाले, तर दृष्टिहीनांना जगण्याचे नवे बळ मिळू शकते. जिल्ह्यातील अजूनही तीनशे दृष्टिहीन प्रतीक्षेत आहेत. शासकीय रुग्णालयात दररोज चार ते पाच जणांचा मृत्यू होतो. मृत व्यक्तीचे नेत्रदान करुन घेण्यासाठी शासनाने समुपदेशक म्हणून अविनाश शिंदे यांची नियुक्ती केली आहे. ते मृत नातेवाईकांची भेट घेऊन नेत्रदानाविषयी प्रबोधन करतात. गेल्या सहा वर्षापासून त्यांचे हे काम सुरु आहे. अनेकदा नातेवाईक तयार होत नाहीत. जे नातेवाईक होकार देतात, त्यांच्याकडून संमतीपत्र घेऊन नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
जिल्ह्यातील अनेक व्यक्ती दृष्टीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना दृष्टी मिळावी, यासाठी रुग्णालयात मरण पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांची भेट घेऊन नेत्रदानासाठी विनंती केली जाते. नेत्रदानाचे महत्त्व समजून दिले जाते. त्यामुळे रुग्णालयात मरणोत्तर नेत्रदानाचे प्रमाण वाढले आहे. भविष्यात ही संकल्पना आणखी चांगल्याप्रकारे राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- अविनाश शिंदे,
नेत्रदान समुपदेशक