सांगलीत वाईन शॉप परवाना देण्याच्या आमिषाने एकाला ८७ लाखांचा गंडा, संशयितावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 03:48 PM2023-08-14T15:48:03+5:302023-08-14T15:48:22+5:30
बनावट शासकीय चलनाच्या पावत्या दिल्या
सांगली : वाईन शॉपचा परवाना मिळवून देण्याच्या आमिषाने शहरातील एकाला तब्बल ८७ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी ए. बी. पवार (रा. गुलमोहर कॉलनी, सांगली) यांनी बसाप्पा शिवप्पा माळी (रा. सांगली) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फेब्रुवारी ते एप्रिल २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी पवार यांना वाईन शॉपचा परवाना हवा होता. यासाठी ते प्रयत्न करत होते. याबाबतची माहिती मिळताच संशयित बसाप्पा माळी याने पवार यांच्याशी संपर्क साधला. परवाना मिळवून देण्याचे काम मी करू शकतो. माझ्या वरिष्ठ पातळीवर ओळखी असल्याचे माळी याने सांगितले. पवार यांनीही विश्वास ठेवून त्याच्याशी बोलणे सुरू ठेवले.
परवाना काढण्यास पैसे लागणार असल्याचे सांगत फिर्यादी पवार यांच्याकडून संशयिताने वेळोवेळी रोख १८ लाख रुपये तसेच सोन्याचे दागिने असे ८७ लाख २५ हजार ५०० रुपये घेतले. पवार यांचा विश्वास बसावा, यासाठी त्याने बनावट शासकीय चलनाच्या पावत्या दिल्या. यानंतर परवाना मिळविण्यासाठी पवार यांनी पाठपुरावा सुरू केला होता. दिलेल्या मुदतीत परवाना न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी पवार यांनी माळी याच्याविरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.