सांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणाचे शुक्लकाष्ठ संपले, ८८१ कोटी मंजूर; ‘ईपीसी’ मोड तत्त्वावर निविदा प्रसिद्ध 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 12:07 PM2023-01-04T12:07:13+5:302023-01-04T12:07:48+5:30

हा रस्ता ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी)प्रमाणे नसेल. शासनाच्या निधीतून काम पूर्ण केले जाणार

881 crore sanctioned for Sangli Peth road, There will be a four lane concrete road | सांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणाचे शुक्लकाष्ठ संपले, ८८१ कोटी मंजूर; ‘ईपीसी’ मोड तत्त्वावर निविदा प्रसिद्ध 

संग्रहीत फोटो

googlenewsNext

सांगली : सांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणामागील शुक्लकाष्ठ अखेर मंगळवारी संपुष्टात आले. दिल्लीत अर्थ समितीच्या बैठकीच्या या रस्त्याच्या कामासाठी ८८१.८७ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट करीत ही माहिती दिली. ईपीसी मोड तत्त्वावर रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार आहे.

वाहनांची वाढती गर्दी, अपघातांचे वाढलेले प्रमाण, खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे ४१ किलोमीटरचा सांगली-पेठ रस्ता नेहमीच चर्चेत राहिला आहे. चौपदरीकरणासाठी सहा वर्षांपासून लढा सुरू आहे. सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलन केले. त्यानंतर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला. प्राधिकरणाने चौपदरीकरणाचा आराखडा तयार करून केंद्राला सादर केला. शासनाने कामाला तत्त्वत: मंजुरीही दिली.

दोन महिन्यांपूर्वी रस्त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली; पण अर्थ समितीची मान्यता नसल्याने ठेकेदारांनी निविदा भरण्याबाबत सावध भूमिका घेतली. पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ व जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून मान्यता देण्याचा आग्रह धरला होता. अखेर मंगळवारी दिल्लीत ८८१ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली.

ईपीसी मोड म्हणजे काय?

सांगली-पेठ रस्त्यासाठी ‘ईपीसी’ मोड तत्त्वावर निविदा प्रसिद्ध केली आहे. यानुसार ठेकेदाराला अभियांत्रिकी आराखडे तयार करणे, साहित्य खरेदी, देखरेख आणि बांधकाम अशा सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. मंजूर निधीमध्येच काम पूर्ण करावे लागेल. कामावर वाढीव खर्च होणार नाही. रस्ता गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होईल. दिलेल्या मुदतीत रस्ता पूर्ण करावा लागेल. अन्यथा आर्थिक दंडही होऊ शकतो.

शासनाकडून टोल वसुली

हा रस्ता ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी)प्रमाणे नसेल. शासनाच्या निधीतून काम पूर्ण केले जाणार आहे. त्यातही वेळेची मर्यादा निश्चित आहे. त्यामुळे कमी कालावधीचा आणि रकमेचा टोल लागू शकेल. महामार्ग प्राधिकरणच टोल रक्कम आणि कालावधी निश्चित करणार आहे. आराखड्यात कसबे डिग्रजजवळ टोल नाका प्रस्तावित केला आहे.

असा असेल रस्ता

सांगली ते पेठ हा ४१.२५ किलोमीटरचा संपूर्ण रस्ता काँक्रिटचा असेल. सांगलीवाडी टोल नाक्यापर्यंत चौपदरीकरण होणार आहे. रस्ता दोन्हीकडे प्रत्येकी साडेसात मीटर रुंदीचा आहे. मधोमध ०.६० मीटरचा दुभाजक आहे. दहा ठिकाणी लहान-मोठे पूल आहेत.

Web Title: 881 crore sanctioned for Sangli Peth road, There will be a four lane concrete road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.