९२ कुपोषित बालके डॉक्टरांकडून दत्तक : अभिजित राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:35 PM2019-01-23T23:35:12+5:302019-01-23T23:36:55+5:30
जिल्ह्यातील पाच वर्षापर्यंतच्या एक लाख ३९ हजार ६३९ बालकांपैकी ९२ बालके अतितीव्र कुपोषित असल्याचे आढळले. याशिवाय ८३२ बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर आहेत. जिल्ह्यातील ९२ कुपोषित बालकांना साधारण श्रेणीत
सांगली : जिल्ह्यातील पाच वर्षापर्यंतच्या एक लाख ३९ हजार ६३९ बालकांपैकी ९२ बालके अतितीव्र कुपोषित असल्याचे आढळले. याशिवाय ८३२ बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर आहेत. जिल्ह्यातील ९२ कुपोषित बालकांना साधारण श्रेणीत आणण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर दत्तक घेणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, एकात्मिक बाल विकास विभागामार्फत दर महिन्याला शून्य ते ६ वयोगटातील बालकांच्या वजनाची तपासणी केली जाते. जिल्ह्यातील एक लाख ३९ हजार ६३९ बालकांची वजने घेतली होती. यामध्ये तीव्र कुपोषित ९२ बालके आढळून आली आहेत.
कुपोषित बालकांसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून ग्राम बालविकास केंद्राच्या माध्यमातून दिवसातून आठवेळा आहार दिला जात आहे. परंतु बालकांमध्ये सुधारणा झालेली नसल्याचे आढळून आले. ९२ कुपोषित बालक साधारण श्रेणीत येण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारीच बालकांना दत्तक घेणार आहेत. त्या बालकांच्या आहारापासून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कुपोषणाच्या उंबरठ्यावर असलेल्या बालकांचीही संख्या ऊस पट्ट्यातच सर्वाधिक आहे. कमी वजनाच्या चार हजार ४४ आणि तीव्र कमी वजनाच्या ५०१ बालकांचा समावेश आहे. या बालकांच्या आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज असून, वेळेवर पोषक आहार देण्याची गरज असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकार राऊत यांनी सांगितले.
सधन तालुक्यांमध्ये स्थिती गंभीर
अभिजित राऊत म्हणाले, वाळवा तालुक्यामध्ये २६, पलूस व खानापूर तालुक्यात प्रत्येकी १२, मिरज तालुक्यात आठ तीव्र कुपोषित बालकांची संख्या आहे. आकडेवारी पाहता, सधन तालुक्यातच कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून येत आहे. यावरून येथील पालकांचे बालकांच्या आहाराकडे फारसे गांभीर्याने लक्ष असल्याचे दिसत नाही, असे जिल्हा परिषद प्रशासनाचे मत आहे.