मणेराजुरी अपहारातील ९ लाख ८५ हजार वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2015 12:37 AM2015-12-29T00:37:31+5:302015-12-29T00:54:26+5:30
जिल्हा बँक : तुंगप्रकरणी चौकशी सुरू
सांगली : मणेराजुरी (ता. तासगाव) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये लेखापालामार्फत झालेल्या ९ लाख २0 हजार रुपयांच्या अपहारप्रकरणी बँकेने कारवाई करीत, कर्मचारी रमेश शिवाजी पाटील याच्याकडून व्याजासह ९ लाख ८५ हजार रुपये वसूल केले.
मणेराजुरी शाखेतील दैनंदिन भरणा करावयाच्या रकमेमध्ये अपहार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर बँकेच्या सांगली शाखेतील अधिकाऱ्यांनी चौकशीस सुरुवात केली होती. हा अपहार नोव्हेंबर महिन्यात झाला होता. १८ नोव्हेंबर रोजी संबंधित कर्मचाऱ्याला तातडीने निलंबित करण्यात आले होते. यासंदर्भात तासगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी, खातेनिहाय चौकशीनंतरच तक्रार दाखल करण्याची सूचना दिली होती. त्यामुळे तक्रार दाखल होऊ शकली नव्हती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्याची खातेनिहाय चौकशी पूर्ण केली. त्यानंतर त्याच्याकडून अपहाराच्या रकमेसह व्याज व चौकशी फीची रक्कमही वसूल केली.
तुंग येथे २६ लाख ९८ हजारांचा अपहार झाला होता. याप्रकरणी दोन शिपाई निलंबित केले होते. यातील ६ लाख १0 हजार वसूल झाले असून, उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र मुख्य सूत्रधार शिपाई फरार असल्याने वसुलीत अडचणी येत आहेत. (प्रतिनिधी)
निलंबन कायम
मणेराजुरी येथील लेखापालाकडून अपहाराची सर्व रक्कम व्याजासह वसूल केली असली तरी, त्याच्यावरील निलंबनाची कारवाई कायम ठेवण्यात आली आहे. कारवाईचा निर्णय आता प्रशासकीय पातळीवर घेतला जाणार आहे.