९८ जागांसाठी ११ हजार अर्ज दाखल...
By Admin | Published: November 16, 2015 11:22 PM2015-11-16T23:22:06+5:302015-11-17T00:04:49+5:30
जिल्हा परिषद : ग्रामसेवकाच्या ३६ जागांसाठी तब्बल साडेपाच हजार अर्ज
सांगली : जिल्हा परिषदेत रिक्त असलेल्या ९८ जागांसाठी तब्बल ११ हजार ३३ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे ५ हजार पाचशे एक अर्ज कंत्राटी ग्रामसेवकाच्या ३६ जागांसाठी प्राप्त झाले आहेत. सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने नेट कॅफेत उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, या विविध पदांसाठीची परीक्षा २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबरअखेर होणार आहे.
जिल्हा परिषदेतील १३ विविध विभागांतील ९८ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. पद, रिक्त जागा व प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे : कनिष्ठ अभियंता : एक जागा, १७ अर्ज. पशुसंवर्धन पर्यवेक्षक : एक जागा, ४९ अर्ज. कनिष्ठ सहायक (लिपिक) : दोन जागा, ३९३ अर्ज. कनिष्ठ सहायक (लेखा) : एक जागा, ३४५ अर्ज. अंगणवाडी पर्यवेक्षिका : दोन जागा, १३५ अर्ज. विस्तार अधिकारी (सांख्यिकी) : एक जागा, १३०५ अर्ज. कनिष्ठ अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) : दोन जागा, १०८ अर्ज. विस्तार अधिकारी (शिक्षण) : एक जागा, २८० अर्ज. औषध निर्माण अधिकारी : तीन जागा, ५८४ अर्ज. आरोग्य सेवक (पुरुष) : आठ जागा, ६२३ अर्ज. आरोग्य सेवक (महिला) : ३८ जागा, ११४९ अर्ज. कंत्राटी ग्रामसेवक : ३६ जागा, ५५०१ अर्ज. स्थापत्य अधिकारी (सहायक) : दोन जागा, ५४४ अर्ज.
९८ रिक्त जागांसाठी दाखल ११ हजार ३३ अर्जात १३७ माजी सैनिकांनीही विविध पदांसाठी अर्ज दाखल केले आहेत.
कंत्राटी ग्रामसेवक पदाबरोबरच आरोग्य सेवक महिला, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), औषध निर्माण अधिकारी आदी पदांसाठी कमी रिक्त जागा असतानाही मोठ्या संख्येने तरुणांनी अर्ज भरले आहेत. २५ नोव्हेंबरपासून २ डिसेंबरपर्यंत या पदांसाठी परीक्षा होणार आहेत. (प्रतिनिधी)