समाधानकारक! सांगलीत पावसामुळे रब्बी, उन्हाळी सिंचनाची चिंता मिटली, ५० वर्षांत प्रथमच ९० टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 03:23 PM2022-11-17T15:23:52+5:302022-11-17T15:24:21+5:30

जवळपास ६३ लघू प्रकल्प आणि चार मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले

90 percent water storage in Sangli for the first time in 50 years | समाधानकारक! सांगलीत पावसामुळे रब्बी, उन्हाळी सिंचनाची चिंता मिटली, ५० वर्षांत प्रथमच ९० टक्के पाणीसाठा

संग्रहित फोटो

Next

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्ह्यातील ८५ लघू प्रकल्प आणि पाच मध्यम प्रकल्पांमध्ये गेल्या ५० वर्षांत प्रथमच ९० टक्के पाणीसाठा आहे. जवळपास ६३ लघू प्रकल्प आणि चार मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे रब्बी आणि उन्हाळी सिंचनाची चिंता मिटल्यामुळे शेतकरी समाधानी आहे.

जलसंपदा विभागाकडील १ नोव्हेंबर २०२२ च्या अहवालानुसार जिल्ह्यातील ८५ लघू आणि पाच मध्यम प्रकल्पांची दहा हजार ९२९.६२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा करण्याची क्षमता आहे. या प्रकल्पांमध्ये सध्या नऊ हजार ७२२ दशलक्ष घनफूट म्हणजेच ९० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी बरोबर याच तारखेला केवळ ६६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. म्हणूनच टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना चालू करून जिल्ह्यातील लघू आणि मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा केला होता.

या वर्षी पाऊसच एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला की, नोव्हेंबर महिना निम्मा संपला तरीही सिंचन योजना चालू कराव्या लागल्या नाहीत. तरीही जिल्ह्यातील लघू प्रकल्पात ९० टक्के आणि मध्यम प्रकल्पात ८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांची रब्बी व उन्हाळी हंगामातील सिंचनाची चिंता मिटली आहे. ६३ पाझर तलाव तुडुंब भरले आहेत.

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पण, रब्बी हंगाम शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. उन्हाळ्यातही पाणी कमी पडणार नसल्यामुळे रब्बीचे पीक उत्तम येणार आहे. याबरोबरच उन्हाळी पिकाचे क्षेत्रही जिल्ह्यात वाढेल, असा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

६३ लघू प्रकल्प १०० टक्के भरले

जिल्ह्यात ८५ लघू प्रकल्प असून त्यापैकी ६३ लघू प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. उर्वरित २२ पाझर तलावांपैकी जत तालुक्यातील दरीबडची ३० टक्के, तिकोंडी क्रमांक एक ७ टक्के, सोरडी ३० टक्के आणि सिद्धनाथ ४० टक्के भरले आहेत. उर्वरित १७ लघू प्रकल्पांमध्ये ८५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.

मध्यम प्रकल्पात ८५ टक्के पाणीसाठा

प्रकल्पएकूण पाणीसाठासध्या पाणीसाठाटक्केवारी
दोड्डानाला२७४.७५  १९६.९१८५
संख७०३.८२  ७०३.८२ १००
बसाप्पावाडी२७४.७५  २७४.७५  १००
मोरणा  ७४७.९७   ७४७.९७  १००
सिद्धेवाडी३०३.०३   ३०२.९५  १००

Web Title: 90 percent water storage in Sangli for the first time in 50 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.