जिल्ह्यातील ९० टक्के महिलांत हिमोग्लोबीनची कमतरता
By admin | Published: May 27, 2016 11:48 PM2016-05-27T23:48:30+5:302016-05-28T00:52:58+5:30
धकाधकीचे जीवन : ग्रामीण भागात प्रमाण अधिक; थायरॉईडचे प्रमाण नगण्य--महिला आरोग्य दिन विशेष
सचिन लाड -- सांगली -सकस आहाराची कमतरता, बदलती जीवनशैली यामुळे महिलांच्या आरोग्याविषयी समस्यांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये हिमोग्लोबीनचा मुद्दा फारच चर्चेत आला आहे. जिल्ह्यात ९० टक्के महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्याचे, शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय तपासणीमध्ये दिसून आले आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे. शासकीय रुग्णालयात मोफत औषधांची सोय करुनही महिला औषधे घेण्यास पुढे येत नाहीत. दरम्यान, थायरॉईडचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. केवळ तीन महिला या आजाराने त्रस्त आहेत.
कुटुंबाचा गाडा चालविताना महिलांचे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होते. पतीला नोकरीवर जाण्यासाठी जेवणाचा डबा तयार करुन देणे, मुलांची शाळेची तयारी करणे, यासह घरातील अन्य व्यक्तींकडेही त्यांना लक्ष द्यावे लागते. यातून त्यांचे स्वत:कडे दुर्लक्ष होते. जेवण वेळेवर करायचे नाही, ही त्यांनी स्वत:ला सवयच लावून घेतली आहे. जेवण करतानाही शिळे अन्न टाकून द्यायची त्यांची इच्छा होत नाही. त्यामुळे त्या स्वत: ते खातात. याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वेगाने कमी होत जाते. शरीरदुखीच्या समस्या सुरु होतात. महिलांमध्ये किमान १२ टक्के हिमोग्लोबीनचे प्रमाण आवश्यक आहे. पण सध्याच्या स्थितीला हे प्रमाण केवळ सात ते आठ टक्के आहे. प्रकृती बिघडल्यानंतर त्या उपचारासाठी रुग्णालयात जातात. त्यावेळी त्यांना डॉक्टरकडून हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्याचे समजते. गर्भवती महिलांमध्येही हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे प्रसुतीवेळी रक्तदाब वाढून जिवाला धोका निर्माण होतो.
शासकीय असो अथवा खासगी रुग्णालयात, प्रकृती बिघडल्याची तक्रार घेऊन महिला गेल्या की, डॉक्टर प्रथम त्यांच्यातील हिमोग्लोबीनची तपासणी करतात. या तपासणीत ९० टक्के महिलांत हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी आढळत आहे.
थायरॉईडचा बाळालाही धोका
जिल्ह्यातील तीन टक्के महिला थायरॉईडने त्रस्त आहेत. वयाच्या तिशीनंतर होणारा हा आजार आता दहाव्या वर्षापासूनच होत आहे. उच्च रक्तदाब व मधुमेहाप्रमाणेच महिलांमध्ये थायरॉईड वेगाने वाढत आहे. शरीरातील आयोडीनचे प्रमाण कमी झाल्यास तो दिसतो. थायरॉईड झालेल्या रुग्णांमध्ये वजन वाढणे, मानसिक आजार होणे, केस लवकर पिकणे, लहान मुलींमध्ये लवकर वयात येणे, अशी लक्षणे दिसून येतात. गर्भधारणेवेळी आईला थायरॉईडचा आजार असल्यास तो बाळालाही होऊ शकतो.
घरातील लोकांची काळजी घेण्याच्या व्यापात महिला स्वत:कडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे हिमोग्लोबीनसह अन्य शरीरदुखीचा त्यांना त्रास होतो. हिमोग्लोबीन वाढीची औषधे घेण्याबरोबरच सकस आहार घेणे आवश्यक आहे.
- डॉ. विद्या मुळे, स्त्रीरोगतज्ज्ञ,
वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली.