जत तालुक्यात ९०० वर्षांपूर्वीचा शिलालेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:25 AM2021-03-18T04:25:34+5:302021-03-18T04:25:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जत तालुक्यातील मल्लाळ येथे डोंगरावर जमीन नांगरत असताना चालुक्य सम्राट विक्रमादित्य (सहावा) यांच्या कारकिर्दीतील ...

900 year old inscription in Jat taluka | जत तालुक्यात ९०० वर्षांपूर्वीचा शिलालेख

जत तालुक्यात ९०० वर्षांपूर्वीचा शिलालेख

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जत तालुक्यातील मल्लाळ येथे डोंगरावर जमीन नांगरत असताना चालुक्य सम्राट विक्रमादित्य (सहावा) यांच्या कारकिर्दीतील शिलालेख सापडला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी या शिलालेखाचा अभ्यास केला आहे. सन ११२० मध्ये एका शिवमंदिरासाठी जतचा प्रमुख दंडनायक बंकेय याने मल्लाळ येथील दहा मत्तर जमीन दान दिल्याचा उल्लेख शिलालेखात आहे.

जत तालुक्याला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. या तालुक्याच्या विविध गावांत चालुक्य, कलचुरी, यादव यांच्या राजवटीतील शिलालेख आढळून आले आहेत. मल्लाळ हे गाव जतपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर आहे. या गावच्या दक्षिणेला सुमारे तीन किलोमीटर अंतरावर डोंगरावर खडकाळ जमीन आहे. यापैकी दीपक माने यांची जमीन नांगरत असताना भगवान काळे यांना एक मोठा दगड आढळून आला. या दगडावर शिवलिंग, गाय-वासरू, कट्यार, सूर्य-चंद्राचे शिल्पांकन होते. खालील बाजूस हळेकन्नड लिपीतील मजकूर होता. याची माहिती मारुती ओलेकर व ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण ओलेकर यांनी मिरज इतिहास संशोधन मंडळाला दिली.

कुमठेकर व काटकर यांनी याठिकाणी जाऊन शिलालेखाचे ठसे घेऊन त्याचा अभ्यास केला. या शिलालेखात एकूण १३ ओळी आहेत. या शिलालेखाचे वाचन हंपी येथील कन्नड विद्यापीठाचे शिलालेखशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर कलवीर मनवाचार यांनी करून दिले. या वाचनासाठी महेंद्र बोलकोटगी (जमगी) यांचेही सहकार्य लाभले. या शिलालेख अभ्यासासाठी सागर कांबळे, विलास हराळे, बिराप्पा बंडगर, कल्लापा माने यांचीही मदत झाली.

या शिलालेखात चालुक्य राजा विक्रमादित्य याचा उल्लेख आला आहे. चालुक्य विक्रमादित्य हा महापराक्रमी होता. त्याने ५० वर्षे राज्य केले. त्याच्या काळात चालुक्य राज्याच्या सीमा गुजरातपासून दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत भिडल्या होत्या. त्याच्या काळात कला, विद्या यांचा मोठा विकास झाला. तो इसवी सन १०७६ मध्ये गादीवर आला. त्याने आपल्या राज्यारोहणानिमित्त स्वतःच्या नावाचा चालुक्य विक्रम शक सुरू केला. कराडच्या शिलाहर राजवंशातील चंदलादेवी ही विक्रमादित्याची महाराणी होती. कराडमध्ये झालेल्या स्वयंवरात तिने विक्रम राजाला पती म्हणून निवडले होते. मल्लाळ येथे सापडलेला हा शिलालेख सांगली जिल्ह्यात विक्रमादित्याचा सापडलेला कालदृष्ट्या पहिला शिलालेख आहे.

काय आहे शिलालेखात

या शिलालेखात जत येथील प्रमुख दंडनायक बंकेय याने शिवमंदिरासाठी १० मत्तर जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. हा लेख १ ऑगस्ट ११२० रोजी लिहिला गेला आहे. या शिलालेखात दंडनायकाच्या विशेषणांचा उल्लेख करण्यात आला आहे.

Web Title: 900 year old inscription in Jat taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.