कवलापुरात दारू दुकान फोडून ९१ हजारांचा माल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:18 AM2021-07-10T04:18:37+5:302021-07-10T04:18:37+5:30
सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील देशी दारुचे दुकान फोडून चोरट्यांनी ९१ हजार २०० रुपयांच्या २९६ दारु बाटल्या, डीव्हीआर ...
सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील देशी दारुचे दुकान फोडून चोरट्यांनी ९१ हजार २०० रुपयांच्या २९६ दारु बाटल्या, डीव्हीआर मशीन असा माल लंपास केला. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी दुकानाचे मालक आनंदराव लक्ष्मण भोईटे (वय ४९, रा. कुमठे) यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी भोईटे यांचे कवलापूर विमानतळ जागेजवळ सरकारमान्य देशी दारूचे दुकान आहे. बुधवारी रात्री आठच्या सुमारास दुकान बंद करून ते गावी गेले. या दरम्यान दुकानात कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद दुकानाच्या गेटचे व दरवाजाचे कुलूप, कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला व देशी दारू व सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर लंपास केला. चोरट्यांनी २५ हजार ९२० रुपये किमतीच्या देशी दारूच्या १८० मिलीच्या ४८ बाटल्यांचे ९ बॉक्स, १७ हजार २८० रुपयांच्या टँगो पंच देशी दारूच्या १८० मिलीच्या बाटल्यांचे ६ बॉक्स, १५ हजार रुपयांचे रेठरे संत्रा देशी दारूच्या ९० मिलीच्या १०० बाटल्यांचे ६ बॉक्स, ३० हजार रुपये किमतीच्या टँगो पंच देशी दारूच्या ९० मिलीच्या १०० बाटल्यांचे दहा बॉक्स आणि ३ हजार रुपये किमतीचा सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा एकूण ९१ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. चोरट्यांनी एकाचवेळी २९६ दारुच्या बाटल्या लंपास केल्याने खळबळ उडाली आहे.
गुरुवारी सकाळी भोईटे हे दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तातडीने त्यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.