दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात ९२ कोटींची उलाढाल
By अविनाश कोळी | Published: October 25, 2023 08:01 PM2023-10-25T20:01:45+5:302023-10-25T20:01:59+5:30
सोन्याच्या बाजारपेठेला झळाळी : इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहनांची मोठी विक्री
सांगली : यंदा दसऱ्याच्या मुहूर्ताला सोन्याच्या बाजारपेठेसह वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, रिअल इस्टेट आदी क्षेत्रांत सुमारे ९२ कोटी रुपयांची उलाढाल झाली. व्यावसायिकांना दसरा पावला असून पंधरा दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठीही आतापासून बुकिंग सुरू झाले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोने व इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायात १० टक्के वाढ झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. नवरात्रोत्सवात यंदा ग्राहकांत खरेदीचा उत्साह दिसून आला. सर्वाधिक उलाढाल वाहन बाजारात दिसून आली. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या खरेदीकडे कल दिसून आला.
सराफ बाजार फुलला
सध्या सोन्याचा ६१ हजार तोळा, तर चांदीचा ७२ हजार ५०० रुपये प्रतिकिलो इतका दर आहे. दरवाढ असतानाही ग्राहकांनी सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी दसऱ्यादिवशी दिवसभर गर्दी केली होती. सराफ व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारात सुमारे २२ ते २३ कोटींची उलाढाल झाली.
वाहन व्यावसायात मोठी उलाढाल
गतवर्षीच्या तुलनेत वाहन बाजार यंदा किंचित वाढ झाली असली, तरी अन्य क्षेत्रांच्या तुलनेत नेहमीप्रमाणे सर्वाधिक उलाढाल दिसली. दुचाकीची अंदाजे २२ कोटी, तर चारचाकी वाहनांची २५ कोटींची उलाढाल झाली.