दुप्पट परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना ९२ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:06 AM2021-01-13T05:06:23+5:302021-01-13T05:06:23+5:30
भारती अरविंद तेरदाळ (रा. कुपवाड रोड मिरज), राजमती प्रकाश मगदुम (रा. इनाम धामणी ता. मिरज). किरण हणमंत बैरागी, (रा. ...
भारती अरविंद तेरदाळ (रा. कुपवाड रोड मिरज), राजमती प्रकाश मगदुम (रा. इनाम धामणी ता. मिरज). किरण हणमंत बैरागी, (रा. ब्राम्हणपुरी मिरज), अशोक जिवबा गुरव (रा. हरळी बु. ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर), ऋतुजा रमेश नार्वेकर (रा. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग) अशी फसवणूक झालेल्यांची नावे आहेत.
महंमद नाैशाद याने त्याच्या डिओस्मीओ कंपनीच्या वेगवेगळ्या योजना सांगून पैसे गुंतविलेल्यांना रकमेच्या दीडपट ते दुप्पट रक्कम ठरावीक दिवसांत परत देण्याचे आमिष दाखविले. आपण दुबईत व्यवसाय करीत असून एमएन ग्रुपच्या डिओस्मीओ कंपनीमार्फत तेथे कमी दराने मिळणाऱ्या सोने खरेदी-विक्री व्यवसायातून मिळणारा नफा गुंतवणूकदारांना देण्याची योजना सांगितली. या योजनेचा बेडग येथील एका एजंटामार्फत प्रचार केला. मिरजेतील एका हाॅटेलात गुंतवणूकदारांच्या बैठका घेऊन एक महिना ते तीन महिन्यांत गुंतविलेल्या रकमेवर दीडपट ते दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखविले. काही जणांकडून एक ते दोन लाख रुपये घेऊन त्यांना दीडपट व दुप्पट परतावा देऊन योजनेप्रमाणे परतावा मिळतो, असा विश्वास निर्माण केला. परतावा मिळालेल्या गुंतवणूकदारांना नाैशाद याने आणखी मोठी गुंतवणूक करण्याची गळ घालत चौघा जणांकडून पंधरा ते वीस लाख रुपये घेतले. सुमारे ९० लाख रुपये रोख रक्कम घेतल्यानंतर नाैशाद याने योजनेत बदल करुन परतावा देण्याची मुदत वाढविली. या मुदतीनंतर गुंतवणूकदारांनी पैशासाठी तगादा लावल्याने नाैशाद याने त्याचा मोबाईल बंद केला. मिरजेतील काही गुंतवणूकदार नाैशाद याच्या शोधात केरळला त्याच्या गावी पोहोचल्यानंतर नाैशाद भेटला नाही. मात्र, त्याने तेथे आलेल्यांना फोनवरुन दमदाटी करत पिटाळून लावले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भारती तेरदाळ यांच्यासह अन्य चार जणांनी गांधी चाैक पोलिसांत मोहम्मद नाैशाद याच्याविरुद्ध ९२ लाख ०३ हजार रुपये रोख रक्कम घेऊन अल्प स्वरूपात परतावे देवून फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे.
भारती तेरदाळ, राजमती मगदुम, किरण बैरागी, अशोक गुरव, ऋतुजा नार्वेकर यांची ९२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गांधी चाैक पोलिसांत महंमद नाैशाद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.