सांगली जिल्ह्यातील ९३ हजार २२५ शेतकऱ्यांनी ई-केवायसीकडे फिरविली पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 12:00 PM2023-07-12T12:00:53+5:302023-07-12T12:01:14+5:30
पीएम किसानच्या हप्त्यापासून वंचित राहावे लागणार
सांगली : केंद्र शासनामार्फत आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत चौदावा हप्ता जमा करण्यात येणार आहे. परंतु, त्यापूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे, ई-केवायसी प्रमाणीकरण व बँक खाते आधारशी संलग्न करण्याचे केंद्र शासनाने बंधनकारक केले आहे. जिल्ह्यातील ९३ हजार २२५ शेतकऱ्यांनी ई-केवायसीच केली नसल्यामुळे त्यांना चौदाव्या हप्त्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ मिळतो. केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना स्वतःहून या योजनेत सहभाग घेण्यासाठी थेट नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ‘पीएम किसान’ संकेतस्थळावर जाऊन लाभार्थ्यांना थेट अर्ज करता येतो. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही दलाल अथवा मध्यस्थाशिवाय एक रुपयाही खर्च न करता पंतप्रधान किसान सन्मान योजनेत नाव नोंदवता येत आहे.
शेतकऱ्यांची भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत असणे, ई-केवायसी प्रमाणीकरण व बँक खाती आधार संलग्न करण्याचे केंद्र शासनाने बंधनकारक केले आहे. जिल्ह्यातील ९३ हजार २२५ शेतकऱ्यांनी ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंदणी आणि बँक खाते आधारशी संलग्न केले नाही. या शेतकऱ्यांना सर्व कागदपत्रांसह तहसील कार्यालयात संपर्क साधावा लागेल. पीएम किसानसाठी ई-केवायसी प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया स्वतः लाभार्थी शेतकऱ्याला करावी लागेल. त्यासाठी शेतकऱ्याला सीएससी केंद्र किंवा पीएम किसानच्या संकेतस्थळावर जावे लागेल. चौदाव्या हप्त्यासाठी लाभार्थ्याला बँक खाते आधार संलग्न करावे लागेल. त्यासाठी शेतकऱ्याला बँकेत जाऊन बँक खात्यात आधार संलग्न करावे लागेल. अन्यथा या लाभार्थ्यांना शासनाकडून दोन हजार रुपये मिळणार नाहीत.
मयत, अपात्र लाभार्थ्यांचीच संख्या जास्त
पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्यांपैकी अनेक शेतकरी मयत आहेत. काही लाभार्थी पात्र नाहीत, म्हणूनही ई-केवायसीसाठी पुढे येत नाहीत. यातूनच ई-केवायसी करणाऱ्यांची संख्या जास्त दिसत आहे. सर्व कागदपत्रांची छाननी करून अपात्र लाभार्थ्यांना पीएम किसान याेजनेतून बाद करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली.
पीएम किसानचे पात्र लाभार्थी
तालुका - अपात्र लाभार्थी
आटपाडी ५४५१
जत १४८५९
क.महांकाळ ७२४३
तासगाव ११५९९
खानापूर ६७४१
मिरज १४५१२
वाळवा १५९२३
शिराळा ७१२४
पलूस ४४४९
कडेगाव ५३२४