शिक्षक भरतीअभावी ९४% उमेदवार तणावग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:08 PM2019-01-28T23:08:04+5:302019-01-28T23:08:08+5:30

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : वर्षभरापासून विविध कारणांनी रखडलेल्या शिक्षक भरतीचे दुष्परिणाम डी. एड्., बी. एड्.धारक ...

94% of the candidates are stressed due to recruitment of teachers | शिक्षक भरतीअभावी ९४% उमेदवार तणावग्रस्त

शिक्षक भरतीअभावी ९४% उमेदवार तणावग्रस्त

Next

शरद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वर्षभरापासून विविध कारणांनी रखडलेल्या शिक्षक भरतीचे दुष्परिणाम डी. एड्., बी. एड्.धारक उमेदवारांच्या मानसिक अवस्थेवर होऊ लागले आहेत. भरती प्रक्रिया लांबल्याने नकारात्मकता आणि मानसिक तणाव वाढला आहे, अशी भावना ९४ टक्के उमेदवारांनी यासंदर्भातील सोशल मीडियावरील सर्वेक्षणात मांडली आहे.
आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिक्षक भरती प्रक्रियेस अखेर शासनाने सुरुवात केली. यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षक म्हणून नोकरी करण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. प्रथम टीईटी त्यानंतर अभियोग्यता चाचणी असे टप्पे ठेवूनही तरुणांनी परिश्रम घेत दोन्ही परीक्षेत आपली गुणवत्ता सिध्द केली होती. केवळ दोन-तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणारी शिक्षक भरती प्रक्रिया अद्यापही लटकलेलीच आहे. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण, त्यानंतर बिंदूनामावली अद्ययावत करण्यासाठी वाढविलेली मुदतवाढ आणि त्यानंतर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या १० टक्के आरक्षणाच्या मुद्द्याबरोबरच राज्यातील अनेक जिल्हा परिषदेने अजूनही बिंदूनामावली अद्ययावत केली नसल्याने शिक्षक भरती नक्की कधी होणार? हे कोणीही सांगू शकत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीकडे टक लावून बसलेल्या डी. एड्., बी. एड्.धारकांचा वारंवार अपेक्षाभंग होत आहे. २८ हजार, २४ हजार आणि त्यानंतर १८ हजार अशी शिक्षकांच्या भरतीची संख्या कमीच होत असल्याने तरुणांत अस्वस्थता वाढत आहे. याचा राग सोशल मीडियावरून उमेदवार व्यक्त करत आहेत. भरतीसाठी राज्यातून १ लाख ९७ हजार ५२0 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातील १ लाख २१ हजार उमेदवार पात्र ठरले आहेत. आता यापैकी १५ टक्के उमेदवारांनाच नोकरीचा लाभ मिळण्याची चिन्हे आहेत.
यासाठी पवित्र शिक्षक संघर्ष समितीच्यावतीने गेल्या आठवड्यात फेसबुक, ट्विटर, वॉटस् अ‍ॅप, टेलिग्राम अशा विविध सोशल मीडियावर एक सर्व्हे घेण्यात आला. या सर्व्हेत ३९९ ते ६०० पर्यंत विद्यार्थ्यांनी भाग घेत आपले मत नोंदविले. त्यानुसार शिक्षक भरती लांबल्याने तरुणांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होत आहे का? या प्रश्नावर ९४ टक्के तरुणांनी होय म्हणून उत्तर दिले, तर ३ टक्के तरुणांनी नाही असे सांगितले. ३ टक्के तरुणांनी काहीही सांगता येत नाही, असे सांगितले आहे.
मानसशास्त्र अभ्यासकांशीही : चर्चा
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मानसशास्त्राच्या अभ्यासकांशी चर्चा केली असता, तरुणांमधील नकारात्मक मानसिकता चिंताजनक असल्याचे सांगितले. तरुण मोठ्या आतुरतेने प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा करत आहेत. नवीन सकारात्मक काही तरी माहिती मिळेल म्हणून सोशल मीडियावर सतत येऊनही तरुणांचा अपेक्षाभंगच होत आहे. त्यामुळे तरुणांनी मानसिक तणावाखाली राहू नये, असे तज्ज्ञांनी सांगितले.

Web Title: 94% of the candidates are stressed due to recruitment of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.