बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदय शस्त्रक्रियेकरीता 95 बालके मुंबईला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:28 PM2019-12-16T12:28:47+5:302019-12-16T12:34:16+5:30
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एस. आर. सी. सी. हॉस्पिटल मुंबई येथे मोफत हृदय शस्त्रक्रियेकरिता सांगली जिल्ह्यातील 95 बालके त्यांच्या पालकांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथून तीन बसमधून रवाना करण्यात आली. यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती सुषमा नायकवडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते.
सांगली: राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एस. आर. सी. सी. हॉस्पिटल मुंबई येथे मोफत हृदय शस्त्रक्रियेकरिता सांगली जिल्ह्यातील 95 बालके त्यांच्या पालकांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथून तीन बसमधून रवाना करण्यात आली.
यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती सुषमा नायकवडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अत्यंत प्रभावीपणे राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतून 0 ते 18 वर्षे वयोगटातील सर्व अंगणवाडी व शालेय बालकांची तपासणी केली जाते. त्यातून संदर्भित करण्यात आलेल्या बालकांवर आवश्यक त्या इतर व हृदय शस्त्रक्रिया निरनिराळ्या योजनेतून पूर्णपणे मोफत करून घेतल्या जात आहेत. या कार्यक्रमांतर्गत दिनांक 21 व 22 नोव्हेंबर 2019 रोजी हृदयरोग संशयित लाभार्थ्यांचे मोफत इको तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
तपासणी मधून गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रियेकरीता संदर्भित करण्यात आलेल्या 95 लाभार्थ्यांना आज एस.आर.सी.सी. हॉस्पिटल मुंबई येथे पाठविण्यात आले. या हॉस्पिटलमध्ये मोफत पूर्वतपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
अत्यंत गुंतागुंतीच्या व अतिखर्चिक अंदाजित 5 लाख प्रती शस्त्रक्रियाप्रमाणे सर्व शस्त्रक्रियेकरीता सरासरी अंदाजित 4 कोटी 50 लाख इतका अपेक्षित असून संबंधित रूग्णालय व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत संदर्भसेवा या निधीमधून हा खर्च करण्यात येणार आहे.
सन 2014 पासून प्रतिवर्षी सातत्याने सलग 6 वर्षे जिल्ह्यातील 950 हून अधिक बालकांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या असून 1 हजार शस्त्रक्रिया पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू आहे. सन 2013-14 पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून आज अखेर 950 हृदय शस्त्रक्रिया व 7 हजार 716 इतक्या इतर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या असून सन 2013 पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्हा हा राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. यावेळी मान्यवरांनी बालकांना शुभेच्छा दिल्या व खाऊचे वाटप केले.