९६७४ शिक्षकांची होणार कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:23 AM2021-01-22T04:23:55+5:302021-01-22T04:23:55+5:30
सांगली : पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ९ हजार ६७४ शिक्षकांची कोरोना चाचणी ...
सांगली : पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ९ हजार ६७४ शिक्षकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. तालुकास्तरावर कोविड रुग्णालये, ग्रामीण भागातील उपजिल्हा तसेच ग्रामीण रुग्णालये, मिरजेत कोविड रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांत शिक्षकांच्या स्वॅबचे नमुने घेतले जात आहेत.
शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी शिक्षण विभागाने अनिवार्य केली आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने चाचण्या सुरू केल्या आहेत. नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले तेव्हाही ९००२ शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या होत्या. त्यामध्ये ४१ जण कोरोनाबाधित आढळले होते. त्यांचे १४ दिवस विलगीकरण झाल्यावरच शाळेत रूजू करून घेण्यात आले होते. त्यातूनही बेडगच्या शाळेत एक शिक्षक चाचणी न करताच गेला होता. त्याने विद्यार्थ्यांची तापमान तपासणीही केली होती. नंतर चाचणीत तो कोरोनाबाधित आढळल्याने घबराट निर्माण झाली होती. शाळा चौदा दिवस बंद ठेवावी लागली होती. हा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी शिक्षण विभाग दक्ष आहे.
चौकट
संख्या मोठी असल्याने रॅपिड ॲन्टीजेन तंत्राचा वापर केला जात आहे. शिक्षक संख्या जास्त असलेल्या गावात आरोग्य केंद्राचे कर्मचारीच किट घेऊन शाळेत जात आहेत. उर्वरित ठिकाणी शिक्षक रुग्णालयात जात आहेत. तपासणीनंतर काही वेळातच अहवाल दिला जात आहे. तो मुख्याध्यापकांकडे सादर करायचा आहे. गेल्या दोन दिवसांत एकही शिक्षक कोरोनाबाधित आढळलेला नाही.
चौकट
जिल्ह्यातील शाळांची संख्या : पाचवी -१३८७ ठिकाणी, सहावी - १२०१ ठिकाणी , सातवी - १२०७ ठिकाणी , आठवी- ८२२ ठिकाणी
जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या - १,७५,४९९, जिल्ह्यातील शिक्षक संख्या - ९,६७४
कोट
प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी करून घेण्याचे आदेश दिले आहेत. चाचणी अहवाल मुख्याध्यापकांकडे सादर करायचे आहेत. चाचणी झाल्यावरच आणि अहवाल निगेटिव्ह असेल तरच शिक्षकांना शाळेत रूजू करुन घेतले जाईल.
- नामदेव माळी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)