जिल्ह्यात ९७ टक्के कोरोना लसीकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:26 AM2021-01-25T04:26:55+5:302021-01-25T04:26:55+5:30
सांगली : जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवातीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता; मात्र आता लसीकरणाने गती पकडली ...
सांगली : जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवातीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता; मात्र आता लसीकरणाने गती पकडली आहे. जिल्ह्यातील नऊ केंद्रांवर शनिवारपर्यंत नाेंदणी असलेल्या ९०० पैकी ८७२ जणांचे लसीकरण पूर्ण झाल्याने ९७ टक्के लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणास दोन टप्प्यात ५१ टक्क्यांपर्यंत लसीकरण पूर्ण झाले होते. लसीकरणासाठी नाेंदणी केलेल्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांत संभ्रमाचे वातावरण असल्याने त्यास प्रतिसाद कमी होता. त्यात लसीकरण ऐच्छिक असल्यानेही परिणाम जाणवत होता.
जिल्ह्यातील नऊ केंद्रावर प्रत्येकी १०० जणांची नोंदणी झाली होती. आता शनिवारपर्यंत ९०० पैकी ८७१ जणांनी लस घेतल्याने ९७ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. यात पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्रात कमी असलेला प्रतिसाद वाढला असून शहरात चांगले लसीकरण झाले आहे. महापालिका क्षेेत्रातील हनुमाननगर केंद्रावर सर्वाधिक १६५ जणांनी लस टोचून घेतली आहे.
प्रशासनाच्या समन्वयाने लवकरच या टप्प्यातील संपूर्ण लसीकरण पूर्ण करण्यात येईल, असे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.