‘कॉल डिटेल्स’वरून ९२ जणांकडे चौकशी वारणानगर चोरी प्रकरण : विश्वनाथ घनवट, दीपक पाटील यांच्याशी संपर्क पडला महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:59 PM2018-01-19T23:59:46+5:302018-01-20T00:01:14+5:30
सांंगली : वारणानगर (जि. कोल्हापूर) येथे सव्वानऊ कोटीच्या रकमेवर डल्ला मारल्याप्रकरणी अटकेत
सांंगली : वारणानगर (जि. कोल्हापूर) येथे सव्वानऊ कोटीच्या रकमेवर डल्ला मारल्याप्रकरणी अटकेत असलेला निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, हवालदार दीपक पाटील यांच्या मोबाईलचे ‘कॉल डिटेल्स’ काढून कोल्हापूर ‘सीआयडी’ने तपासाला गती दिली आहे. सांगली शहर परिसरातील तब्बल ९२ जण नोटाबंदीनंतर या दोघांच्या संपर्कात आल्याची माहिती पुढे आल्याने, ते संशयाच्या भोवºयात सापडले आहेत. यामध्ये काही पोलिस अधिकारी, कर्मचारी, तसेच इतरांचा समावेश आहे.
सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तीन वर्षापूर्वी मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये झोपडीवजा घरावर छापा टाकून तेथून तीन कोटीची रोकड जप्त केली होती. याप्रकरणी मैनुद्दीन मुल्ला यास अटक केली होती. चौकशीत त्याने ही रक्कम वारणानगर येथून चोरल्याची कबुली दिली होती. गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मुल्लाला सोबत घेऊन वारणानगरला छापा टाकून तिथेही कोट्यवधीची रोकड जप्त केली होती. पण या कारवाईवेळी पथकाने सव्वानऊ कोटीची रोकड परस्पर हडप केली होती. हा प्रकार तब्बल वर्षभरानंतर उघडकीस आला.
याप्रकरणी तत्कालीन पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहाय्यक निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहाय्यक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार शंकर पाटील, दीपक पाटील, कुलदीप कांबळे, रवींद्र पाटील यांच्याविरुद्ध कोडोली (ता. पन्हाळा) पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कुरळपकर सोडला, तर सर्वजण सध्या कोल्हापुरातील कळंबा कारागृहात आहेत.
कोल्हापूर सीआयडीकडून या गुन्ह्याचा तपास सुरु आहे. संशयितांकडून तपासात कोणतेही सहकार्य मिळाले नसल्याने, एक रुपयाही त्यांच्याकडून जप्त करण्यात यश आलेले नाही. अटकेतील काही संशयितांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे, तर या गुन्ह्यातील फिर्यादीने, तपास योग्य झाला नसल्याची तक्रार केली असल्याचे समजते.
केंद्र सरकारने पाचशे व हजारच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर मार्च २०१७ मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे सीआयडीने या सर्वांचे ‘कॉल डिटेल्स’ काढून तपासाला नवी दिशा दिली आहे.
केंद्र सरकारतर्फे नोटाबंदीनंतर संशयितांच्या संपर्कात कोण- कोण आले, त्यांची यादी बनविण्यात आली आहे. यामध्ये दोन किंवा तीनपेक्षा जादा कॉल झालेले लोक संशयिताच्या पिंजºयात उभे केले आहेत. विशेषत: विश्वनाथ घनवट व दीपक पाटील या दोघांच्या एकाचवेळी संपर्कात आलेले तब्बल ९२ जण संशयाच्या भोवºयात सापडले आहेत.
कोल्हापूर ‘वारी’कॉल डिटेल्स’वरुन सीआयडीने चौकशीसाठी आमंत्रित केल्याने अनेकांची कोल्हापूरला सीआयडी कार्यालयात ‘वारी’ सुरु झाली आहे. यामध्ये शहरातील तसेच दीपक पाटीलच्या कवलापूर (ता. मिरज) गावातील काहीजणांचा समावेश आहे. चौकशीला बोलाविल्यानंतर संशयितांना कशासाठी मोबाईल संपर्क साधला होता, अशी विचारणा करुन त्यांचा जबाब नोंदवून घेतला जात आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील काही पोलिसांनाही चौकशीसाठी बोलाविले आहे. सहा महिन्यापूर्वी सांगलीच्या सीआयडी कार्यालयातही स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या तत्कालीन पाच पोलिसांची चौकशी झाली आहे. यातील अरुण टोणे हा पोलिस अनिकेत कोथळे खून प्रकरणात अडकला आहे.
कुरळपकर कुठे आहे?
गुन्हा दाखल होऊन वर्षाचा कालावधी होत आला तरी, निलंबित सहाय्यक पोलिस फौजदार शरद कुरळपकर याचा शोध घेण्यात सीआयडीला यश आलेले नाही. सर्व संशयित सीआयडीला शरण आले. पण कुरळपकर गुंगारा देत फरारी आहे. स्थानीक पोलिसांचे सहकार्य मिळेनासे झाले आहे.