सांगली जिल्ह्यात मराठा समाजाचे ९९ टक्के सर्वेक्षण पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 01:24 PM2024-02-03T13:24:27+5:302024-02-03T13:24:52+5:30
सर्वेक्षणाची माहिती आज राज्य मागासवर्ग आयोगाकडे
सांगली : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी जिल्ह्यात तीन लाख ९९ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत तीन लाख ८० हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. त्याचे प्रमाण ९९ टक्के असून, रात्री बारा वाजेपर्यंत सर्वेक्षणाचे काम सुरूच राहिल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. एकत्रित सर्वेक्षणाची माहिती राज्य मागासवर्ग आयोगाकडे शनिवारी सादर करण्यात येणार आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार राज्यात मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. जिल्ह्यात पाच हजार प्रगणकांची नेमणूक केली असून त्यांच्यामार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू झाले. प्रारंभी ॲपमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र त्यानंतर काम गतीने करण्यात आले. रात्री दहा वाजेपर्यंत प्रगणकांकडून कामकाज सुरू राहिले. जिल्ह्यातील तीन लाख ९९ हजार कुटुंबांच्या सर्वेक्षणाचा अंदाज होता. मात्र, त्यापेक्षा जादा सर्वेक्षण होण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी संध्याकाळपर्यंत तीन लाख ८० हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात ९९ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असले, तरी रात्री बारा वाजेपर्यंत कुटुुंबांचे सर्वेक्षणाचे काम सुरूच राहिले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी सांगितले. मराठा मागासलेपणाचा सर्वेक्षण सात दिवसांत म्हणजे, ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना होत्या. तांत्रिक अडचणींमुळे या कालावधीत काम पूर्ण होणार नसल्याने दोन दिवस मुदत वाढवून देण्यात आली होती. त्याची मुदत शुक्रवारी संपली.
जिल्ह्यातील प्रगणकांकडून रात्री उशिरापर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी शनिवारी सर्व तालुक्यातून जिल्हा प्रशासनांकडे जमा होईल. त्यानंतर एकत्रित सर्वेक्षणाची माहिती राज्य मागासवर्ग आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे.